KPSC Scams | केपीएससी घोटाळ्यातील लाच बेळगावातील बँकांत!

सीआयडीचा तपास; बेळगावसह बिदर, भालकीतील ३५ खाती गोठवली
 KPSC Scams |
KPSC Scams | केपीएससी घोटाळ्यातील लाच बेळगावातील बँकांत!
Published on
Updated on

बंगळूर : केपीएससीच्या पशुवैद्यकीय अधिकारी भरती घोटाळ्यात एजंट असलेल्या बसवराज कन्नाळे याने उमेदवारांकडून लाच म्हणून घेतलेली रक्कम बेळगाव, बिदर, भालकी, गुलबर्गा येथील ३५ बँक खात्यांमध्ये साठवून ठेवल्याचे उघड झाले आहे. सीआयडीने ही ३५ बँक खाती गोठवली आहेत. ही रक्कम काही कोटींमध्ये आहे.

कन्नाळे हा मूळचा बिदरचा असून, त्याने पशुवैद्यकीय भरतीची प्रश्र्नपत्रिका ठरावीक उमेदवारांना आधीच उलपब्ध करून दिल्याचा आरोप आहे. याकामी त्याला आयएएस अधिकारी ज्ञानेंद्रकुमार गंगवार यांनी मदत केल्याचा आरोप आहे. दोघेही सीआयडीच्या अटकेत आहेत. भालकी सहकारी बँकेसह बेळगाव, बिदर व गुलबर्ग्यातील खासगी बँकांमध्ये लाचरक्कम ठेवण्यात आली होती. पशुवैद्यकीय अधिकारी पदासाठी काही उमेदवारांकडे ४० लाख ते ८० लाख रुपयांपर्यंतची मागणी करण्यात आल्याचे सीआयडी तपासात उघड झाले आहे. या बँकांमधून कोट्यवधी रुपये हस्तांतरित झाल्याचे दर्शवणारे दस्तऐवज आढळून आले आहेत. तथापि, सीआयडी या बँकांची नावे जाहीर केलेली नाहीत.

कन्नाळेचे जवळचे सहकारी व मित्रांच्या बँक खात्यांमधूनही आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय असून, सीआयडी चौकशी करत आहे. केपीएससी घोटाळ्याच्या आर्थिक नेटवर्कचे धागेदोरे आणखी व्यक्ती व प्रभावशाली व्यक्तींपर्यंत पसरलेले असण्याची शक्यता आहे. सीआयडी अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या कन्नाळेने काही पुरावे कावेरी नदीत फेकून दिले असल्याचे कबूल केले आहे. आपला मोबाईल फोन व लॅपटॉप फेकल्याचे सांगितल्याने सीआयडी अधिकारी तांत्रिक पुराव्यांचा शोध घेत आहेत. अधिकाऱ्यांसमोर कबुली देताना कन्नाळे व आयएएस अधिकारी ज्ञानेंद्रकुमार गंगवार यांच्यात झटापट झाल्याचेही कळते. हे दोघेही एकमेकांचे घनिष्ठ मित्र मानले जातात. दोघेही सीआयडीच्या अटकेत आहेत. त्यांनी एकमेकांना मदत केली आहे. ज्या रिसॉर्टमध्ये उमेदवारांना प्रशिक्षण दिले जात होते, तिथून थोड्याच अंतरावर ज्ञानेंद्र यांचा भूखंड आढळून आला आहे. उमेदवारांच्या प्रशिक्षणादरम्यान ज्ञानेंद्र तिथेच राहत होते. सीआयडीने ज्ञानेंद्रच्या भूखंडावर छापा टाकला आहे. हा भूखंड लाचेच्या रकमेतून खरेदी करण्यात आल्याचे मानले जाते.

नेमका घोटाळा काय?

८ जानेवारी २००६ रोजी ३८१ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदासाठी कर्नाटक लोकसेवा आयोगाने परीक्षा घेतली. मात्र या परीक्षेच्या प्रश्र्नपत्रिका बसवराज कन्नाळे नामक एजंटने आयएएस अधिकारी ज्ञानेंद्रकुमार गंगवार यांच्या मदतीने फोडून ४० ते ८० लाख रुपयांना विकल्याची तक्रार आहे.

शिवशंकरप्पा यांना दणका

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरती प्रक्रियेवेळी शिवशंकरप्पा साहुकार हे कर्नाटक लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष होते. हा घोटाळा उघडकीस येताच सरकारने त्यांना निलंबित केले. त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र सोमवारी तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे शिवशंकरप्पा यांना सीआयडीकडून कधीही अटक होण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती विश्वजित शेट्टी यांच्या एकसदस्यीच खंडपीठाने सोमवारी जामीन अर्ज फेटाळताना, स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहारामुळे यंत्रणेवरचा लोकांचा विश्र्वास संपत चालल आहे, अशी टिप्पणी केली. तसेच दोषींना तातडीने अटक झाली पाहिजे, अशी सूचनाही दिली.

कुणालाही संरक्षण नाही : प्रियांक खर्गे

केपीएससी परीक्षेतील घोटाळ्यात सहभागी असलेल्या कोणालाही संरक्षण देण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारी छेडछाड आमचे सरकार सहन करणार नसल्याचे मत गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी व्यक्त केले आहे. परीक्षेत गैरप्रकार करणारे कितीही बलवान असले तरी राज्य सरकार याप्रकरणी कायदेशीर कारवाई करत आहे, असे ते म्हणाले. सगळ्या संशयितांना कोर्टासमोर आणले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news