

संकेश्वर: हुक्केरी तालुक्यातील संकेश्वरपासून दहा किमीवरील कोनकेरी या छोट्या गावातील दोघा सख्ख्या भावांनी लग्न जमत नसल्याने विषप्राशन करून जीवन संपवल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. सधन कुटुंबातील संतोष रवींद्र गुंडे (वय 55) व अण्णासाहेब रवींद्र गुंडे (वय 50) या बंधूनी लग्न जमत नसल्याने मानसिक त्रासातून विषप्राशन करून जीवनयात्रा संपवल्याने कोनकेरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोनकेरी गावच्या शेतवडीतील कालिकानगर येथे वृद्ध आईसमवेत वास्तव्य करणारे हे बंधू लग्न जमत नसल्याने दारूच्या आहारी गेले होते. यातूनच त्यांनी विषारी औषध घेतले. मात्र, काही क्षणात त्रास होऊ लागल्याने त्यांनी पाणी मागण्यास सुरुवात केली. शेजारील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे सांगितले.
सदर घटना त्यांच्या बंगळूर येथील बहिणीला कळविण्यात आली. दोघा भावांना नागरिकांनी गडहिंग्लज येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांची बहीण त्रिशाला बंगळूरहून आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. सधन परिस्थिती असूनही त्यांनी जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अंत्यसंस्कारादिवशी गावात कोणीही चूल पेटवली नाही.
संतोष व अण्णासाहेब या बंधूचे वडील रवींद्र गुंडे यांचे 35 वर्षांपूर्वी निधन झाल्याने आई व चुलत्याने त्यांचा सांभाळ केला. सध्या वृद्ध आई सुमित्रा गुंडे आजारी असल्याने दोन बंधू आईची सेवा करत होते. विशेषत: आईच्या आजारपणात जेवण बनवताना ते बहीण त्रिशाला यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून जेवण कसे बनवायचे, याची माहिती घेत होते. त्यांचे वडील रवींद्र गुंडे यांना गावात सावकार या टोपण नावाने ओळखले जात होते. गावात त्यांची शेतजमीन अधिक असून त्या शेतावर काही मजुरांचा उदरनिर्वाह चालत असे.