

कोगनोळी : गेले तब्बल ३१ तास सुरू असलेले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन बुधवारी सायंकाळी स्थगित करण्यात आले. सामान्य लोकांचे हाल होऊ नयेत, यासाठी हे रास्ता रोको आंदोलन स्थगित करून आता साखर कारखान्यांना घेराव घालण्यात येईल, अशी घोषणा माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता शेतकऱ्यांनी टोल नाक्यांवरील ठिय्या आंदोलन मागे घेतले. त्याबरोबर लगेच महामार्गावरील रहदारी सुरू झाली.
दरम्यान, कोगनोळी नाक्यावरील शेतकरी महाराष्ट्रातील कारखान्यांच्या दिशेने निघाले, तर हत्तरगी नाक्यावरील शेतकरी हुबळीच्या दिशेने निघाले असून, पुन्हा केंद्रीय आहारमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.
गुरुवारी सकाळी सर्वप्रथम रेटरे येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर धडक देण्यात येणार आहे. त्यानंतर परिसरातील कारखान्यांचे गाळप बंद करण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे, अशी घोषणा शेट्टी यांनी केली. बुधवारी सायंकाळी आंदोलकांना संबोधित करताना शेट्टी म्हणाले, आंदोलनामुळे अनेकांची गैरसोय झाली. विशेषतः कंटेनर आणि अवजड वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. त्यांची अधिक गैरसोय होऊ नये, या उद्देशाने ३१ तासांनंतर आंदोलन स्थगित करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असतानाही महाराष्ट्रातील काही कारखानदारांनी कारखाने सुरू केले आहेत; मात्र उसाला योग्य दर निश्चित होईपर्यंत साखर कारखान्यांतून साखर बाहेर पडू देऊ नका. एखाद्या कारखानदाराने साखर विक्रीसाठी बाहेर नेण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित साखरेचा ट्रक अडवून ती साखर गरिबांना वाटून टाका, असे आवाहन शेट्टी यांनी केले.
हुबळीकडे रॅली
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार अद्याप ठोस निर्णय घेत नाही. सरकारने योग्य निर्णय घेतला नाही, तर पुन्हा कोगनोळीत आंदोलन करू. कर्नाटकातील शेतकरी चुनाप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली हुबळीकडे जात आहेत, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. आंदोलन स्थगित करताना त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना एकजुटीची शपथ दिली.
वाहनांना त्रास नको
आंदोलन संपल्यानंतर महामार्गावरून जाणाऱ्या अवजड तसेच अन्य वाहनांना कोणताही धोका किंवा त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. यापुढे साखर कारखानेच नव्हे, तर लहान-मोठी गुऱ्हाळघरेही बंद ठेवण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या शेतात ऊस असेपर्यंतच महत्त्व आहे, असेही शेट्टी म्हणाले. यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेकडो शेतकरी उपस्थित होते.