Belgaum bullock theft: रात्रीत दोन बैलजोड्यांची चोरी

रामगुरवाडी, कौंदल येथील बैलजोड्यांचा समावेश
Theft
TheftPudhari
Published on
Updated on

खानापूर : तालुक्याच्या ग्रामीण भागात जनावरे चोरांनी डोके वर काढले आहे‌. रामगुरवाडी आणि कौंदल येथील शेतकऱ्यांच्या एकाच रात्रीत दोन बैलजोड्या चोरीला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सध्या मशागतीची आणि भात पेरणीची धांदल सुरू आहे. पावसाच्या भीतीने शेतकरी पहाटेपासून सायंकाळी उशिरापर्यंत शेती कामे पूर्ण करण्याच्या धडपडीत आहे. बहुतांश ठिकाणी शेतामध्ये जनावरांच्या गोठ्यांची व्यवस्था आहे. अशा ठिकाणी नेहमीप्रमाणे बांधून ठेवलेली जनावरे पळविणारी टोळी सक्रिय झाली आहे. खानापूर शहरालगतच्या रामगुरवाडी आणि कौंदल या गावांमध्ये शनिवारी रात्री एकाचवेळी बैलजोड्या लंपास करण्‍यात आल्‍या.

कौंदल येथील जोतिबा गणपती पाटील यांचे होनकल-कौंदल रस्त्यावर शेतात घर आहे. त्याच्या दोन्ही बाजूला घरे आहेत. पाटील यांच्या दोन बैल जोड्या असल्याने त्यापैकी एक बैलजोडी गावातील घराकडे बांधण्यासाठी ते गेले होते. जाताना शेतातील घराला कुलूप लावून गेले होते. हे कुलूप तोडून चोरट्यांनी अवघ्या अर्धा तासात बैलजोडी पळविली.

रामगुरवाडी येथील शेतकरी तुकाराम बाळू मोटर यांच्या बाबतीत सारखाच प्रकार घडला आहे. गावापासून दीड किमीवर त्यांचे शेत आहे. शेतात जुने घर देखील आहे. शनिवारी दिवसभर शेतीची कामे पूर्ण करून तुकाराम मोटर रात्री जेवणासाठी गावातील घरी गेले होते. नेमकी हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी शेतात बांधून ठेवलेली बैल जोडी पळविली आहे.

शेतामध्ये जनावरे बांधून ठेवली असल्यास शेतकऱ्यांनी रात्री शेतातील घरातच वास्तव्यास राहावे. तसेच शक्य असल्यास शेतीची कामे पूर्ण झाल्यानंतर जनावरे गावामध्ये सुरक्षित ठिकाणी आणून ठेवावीत. अपरिचित व्यक्ती, संशयास्पद वाहने किंवा रात्री उशिरा फिरणाऱ्या संशयास्पद लोकांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या व्यक्ती दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ खानापूर पोलिसांशी 08336-222333 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news