

खानापूर : पुढारी वृत्तसेवा
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी थर्टी फर्स्ट करून घरी परतणाऱ्या तरुणावर काळाने घाला घातला. भरधाव दुचाकीची दुभाजकाला धडक बसून गंभीर जखमी झालेल्या दोन युवकांपैकी एकाचा मृत्यू झाला.
सुरज संदीप कुंडयेकर (वय २२) निंगापूर गल्ली खानापूर असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. खानापूर-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर प्रभूनगर जवळ बुधवारी (दि. ३१) रात्री साडेअकरा वाजता हा अपघात घडला. मागे बसलेला त्याचा मित्र गणेश मोहन बुचडी रा. दुर्गानगर खानापूर हा जखमी झाला आहे.
सुरज व गणेश दुचाकीवरून बुधवारी जेवणासाठी काटगाळी क्रॉस रात्री जवळील हॉटेलवर गेले होते. जेवण आटोपून रात्री साडेअकराच्या सुमारास ते केए २२-ईएल-०३७४ क्रमांकाच्या दुचाकीवरून खानापूरच्या दिशेने परत येत होते. प्रभूनगर गावच्या हद्दीत दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांच्या दुचाकीची दुभाजकाला धडक बसली.
दोघेही उडून रस्त्यावर कोसळले. सुरज याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी खासगी दवाखान्यात नेताना चन्नम्मा सर्कल जवळ रात्री २.४० वा. त्याची प्राणज्योत मालवली.
तो प्लंबिंगचे काम करत होता. मागे बसलेला गणेश याच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. त्याच्यावर बेळगाव येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत. नववर्षाची पहिलीच पहाट एका होतकरू तरुणाचा जीव घेणारी ठरल्याने शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.