Khanapur laterite stone smuggling: खानापूर तालुक्यातून जांभ्याची तस्करी

बेकायदा उत्खनन जोरात; प्रशासनाचे दुर्लक्ष, प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग
laterite stone smuggling
laterite stone smugglingPudhari
Published on
Updated on

बेळगाव : घनदाट जंगले व समृद्ध जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या खानापूर तालुक्याचे पर्यावरण धोक्यात आले आहे. तालुका आता बेकायदा जांभा उत्खननाचा केंद्रबिंदू बनत आहे. सिमेंट उत्पादनातील प्रमुख कच्चा माल असलेल्या जांभा मातीला प्रचंड मागणी आहे. त्याचे व्यावसायिक मूल्यही अधिक असल्याने प्रभावशाली व्यक्तींकडून त्याचे बेकायदा उत्खनन जोरात सुरू आहे. शासकीय यंत्रणांनी कानाडोळा केल्याने हा व्यवसाय वेगाने फोफावत आहे.

खानापूर तालुक्यात सापडणाऱ्या जांभ्याची गुणवत्ता 30 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने त्याला बाजारात मोठी मागणी आहे. तालुक्यात एकाही ठिकाणी शासकीय मान्यता वा परवानाप्राप्त जांभा खाण नाही. तरीसुद्धा काही गावांतून मोठ्या प्रमाणावर बेकायदा उत्खनन व वाहतूक सुरू असून त्यावर कुणाचेच नियंत्रण नाही. मुख्य म्हणजे जांभा उत्खनन व वाहतून उघडपणे केली जात आहे. खाण व भूगर्भ, वन आणि पोलिस खात्याकडूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. राजकीयदृष्ट्या प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असल्याने कायद्याची अंमलबजावणी वा कारवाई करण्यात अडथळे येत आहेत.

उच्च प्रतीच्या जांभ्याचे मुबलक साठे असलेल्या तोराळी, गोलिहळ्ळी, बेटगेरी आणि आमटे या गावांना बेकायदा उत्खननाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या गावांतून रोज 20 ते 50 ट्रक जांभा मातीची वाहतूक होत आहे. तपासणी टाळण्यासाठी रात्रीच्यावेळी उत्खनन केले जाते. हा कच्चा माल परवानाधारक पुरवठादारांच्या माध्यमातून प्रमुख सिमेंट उत्पादक कंपन्यांपर्यंत पोचविला जातो. बेकायदा खाणमालक हा कच्चा माल कमी किमतीत विकत असल्याने कायदा धाब्यावर बसवणारी एक भूमिगत पुरवठा साखळी निर्माण झाली आहे.

शेजारील बेळगाव तालुक्यातही बेकायदा जांभा उत्खनन जोमात आहे. तालुक्यात तीन जांभा खाणपट्टे मंजूर करण्यात आले होते. त्यातील एक बेळगुंदीत तर दोन इनाम बडसमध्ये होते. मात्र, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार इनाम बडसमधील दोन खाणपट्टे रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान, बिजगर्णी व बाकनूर गावांमध्ये बेकायदा उत्खनन सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news