

खानापूर : दांडेली जंगलातून खानापूर तालुक्यात आलेल्या हत्तींच्या कळपाने शेतकऱ्यांची झोप उडविली आहे. पिकांचे नुकसान करत आगेकूच करणाऱ्या हत्तींच्या कळपामागून फिरणारे वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी केवळ नुकसानीचा पंचनामा करण्यात धन्यता मानत आहेत. शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावरील सावरगाळी शिवारात हत्तींनी तळ ठोकला असून भातगंजी पायदळी तुडवून टाकली आहे.
नागरगाळी, गोधोळी, गोदगेरी, सुलेगाळी, हलगा तसेच तिनईघाट, पाली, डोंगरगाव, तिओली, गुंजी, संगरगाळी, माणिकवाडी असा प्रवास करुन शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावरील सावरगाळी परिसरात हत्तींचा कळप दाखल झाला आहे. दरम्यानच्या काळात सुलेगाळीत वीजवाहिन्यांचा स्पर्श झाल्याने महिनाभरापूर्वी दोन हत्तींचा मृत्यू झाला होता. तसेच आतापर्यंत हत्तींनी हजारो एकरातील भात व ऊस पिकांचे नुकसान केले असून शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसला आहे.
शनिवारी पाच हत्तींच्या या कळपाने सावरगाळीतील नागाप्पा गुरव आणि गंगाराम कापोलकर यांच्या शेतातील भातगंजींची धूळधाण केली. गंगाराम कापोलकर यांचे मळणी करुन ठेवलेले दहा पोती भात पीक फस्त केले आहे. या शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत पाण्यात गेली आहे. त्याशिवाय मोठा आर्थिक फटका बसला आहे. हत्तींनी भाताची नासाडी तर केलीच पण भाताच्या गंजीखाली अंथरण्यात आलेली ताडपत्री जंगलात फेकून दिली आहे. हत्तींच्या या आक्रमकतेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
यंदा सावरगाळीतील हत्ती गतवर्षीप्रमाणेच नंदगडच्या शिवारात जाणार की, खानापूरच्या दिशेने येणार, याकडे शेतकरी आणि वनखात्याचे लक्ष लागले आहे. वनखात्याने हत्तींनी केलेल्या नुकसानीच्या भरपाईत वाढ केली आहे. पण, योग्य प्रकारे पंचनामा करुन वेळेत भरपाई मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. वनखात्याचे अधिकारी आणि कर्मचारी बेदरकारपणे वागत असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटना हत्ती समस्येवर चिडीचूप असल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे.
ठोस उपाययोजना हवी
सुलेगाळीतील दुर्घटनेनंतर हत्तींना इजा होऊ नये, यासाठी ग्रामस्थांमध्ये जागृती केली जात आहे. त्यासाठी हत्तींपासून वाचण्याचे उपाय सांगितले जात आहेत. त्यासाठी वनाधिकाऱ्यांकडून गावोगावी बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. हत्तींना हुसकावण्यासाठी फटाके फोडू नका, दगड मारुन त्यांना पिटाळण्याचा प्रयत्न करु नका, असे आवाहन केले जात आहे. पण, हत्तींना लोकवस्तीपासून दूर जंगलात हुसकावण्यासाठी वनखात्याकडून कोणत्याच उपाययोजना आखण्यात आलेल्या नाहीत.