

कारवार : गणेशगुडी (ता. जोयडा, जि. कारवार) येथील काळी नदीमध्ये राफ्टिंग करताना विजेचा धक्का लागून बंगळूर येथील अभियंत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. महेश (वय 27) असे मृताचे नाव आहे. सुदैवाने त्याच्यासोबत असलेले इतर चार अभियंते बचावले.
समजलेल्या माहितीनुसार बंगळूर येथून पाच मित्र सहलीसाठी गणेशगुडी येथील एका रिसॉर्टमध्ये आले होते. दरम्यान काळी नदीत राफ्टिंग करत असताना नदीत पाणी सोडण्यासाठी रिसॉर्टने बसवलेल्या एका पंपसेटमुळे अचानक विद्युत प्रवाह वाहू लागला. या प्रवाहाच्या तडाख्यात सापडल्याने महेशचा जागीच मृत्यू झाला.
या ठिकाणी पर्यटक राफ्टिंगसारखा साहसी खेळ खेळतात. त्या ठिकाणी रिसॉर्टने एक इलेक्ट्रिक पंप बसवला होता. यासदंर्भात खबरदारी म्हणून स्थानिकांनी व पर्यंटकांनी याबद्दल रिसॉर्ट मालकाला सूचना केल्या होत्या. तरीदेखील रिसॉर्ट मालकाने याकडे दुर्लक्ष केल्याचे कळते. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेबाबत रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई केली आहे.