

कारवार : नोव्हेंबर महिना सुरु झाला तरी कारवार जिल्ह्यातील मासेमारी व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरु होऊ शकलेला नाही. जिल्ह्यात अपवाद वगळता सुरु असलेला सातत्यपूर्ण पाऊस व चक्रीवादळांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अधूनमधून कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पाऊस कोसळत असल्याने खोल समुद्रात जाऊन मासेमारी करणे अवघड बनले आहे. त्यामुळे, मासेमारी बोटी विविध बंदरात नांगरुन ठेवल्या असून मच्छिमार हवामान सुधारण्याची वाट पाहत आहे.
यंदा मे महिन्याच्या अखेरीस मासेमारी व्यवसाय बंद झाला होता. नारळी पौर्णिमेला हा व्यवसाय सुरु होणे अपेक्षित होते. त्यानुसार तो सुरुही झाला. परंतु, यंदा पाऊस लांबल्याने मासेमारी व्यवस्याय सलगपणे सुरु राहू शकलेला नाही. अरबी समुद्रात अधूनमधून कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पाऊस पडत असल्याने मासेमारीत व्यत्यय येत आहे. प्रतिकूल हवामानामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देत जीव धोक्यात घालून मासेमारी करावी लागत आहे. सातत्याने निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे कारवारसह राज्याच्या किनाऱ्यावरील मासेमारीवर गंभीर परिणाम झाला आहे. जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे खोल समुद्रात मासेमारी करणे धोकादायक बनले आहे. त्यामुळे, अनेक मासेमारी बोटी बंदरांत परतल्या आहेत. कारवार, अंकोला, होन्नावरसह मंगळूर, मालपे आणि इतर किनारी भागातील अनेक जहाजे सध्या कारवार बंदरात नांगरली जात आहेत. हवामान स्वच्छ होईपर्यंत मच्छिमार बोटींवरच आश्रय घ्यावा लागत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानंतर मत्स्यव्यवसाय खात्याकडून खोल समुद्रातील मासेमारीवर अधूनमधून बंदी घातली जात आहे. या निर्बंधामुळे मच्छिमारांची नाजूक आर्थिक परिस्थिती आणखी कठीण होत आहे. तीन महिन्यांपूर्वी नवीन मासेमारी हंगाम सुरू झाला असला तरी हवामानातील सततच्या बदलांमुळे त्यांना नियमित मासेमारीचे काम करता आलेले नाही. परिमामी त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास भविष्यात मासेमारी करणे अवघड बनणार आहे. त्यामुळे, स्थानिकांमध्ये चिंता निर्माण झाली असून हवामान सुधारण्याची प्रतीक्षा केली जात आहे.