

निपाणी : निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेचा तिसरा टप्पा मंगळवार दि. ३० जूनपासून सुरू होत असून, निपाणी परिसरातही त्याची व्यापक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळणार आहेत.
तीन वेळा भेट देऊनही मतदार उपलब्ध न झाल्यास संबंधित व्यक्तीचे नाव मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी या प्रक्रियेला गांभीर्याने प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त ठेवणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. पात्र नागरिकांची नावे समाविष्ट करणे, मृत अथवा स्थलांतरित व्यक्तींची नावे वगळणे तसेच चुकीच्या नोंदी दुरुस्त करणे यासाठी विशेष पडताळणी मोहीम राबविण्यात येत आहे.
मंगळवार, दि ३० जून ते २९ जुलैदरम्यान घरभेटी
३० जून ते २९ जुलै या कालावधीत बीएलओ प्रत्येक घराला तीन वेळा भेट देणार आहेत. या काळात मतदारांनी आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत. तिन्ही भेटींत संपर्क न झाल्यास संबंधित घरावर नोटीस लावण्यात येणार असून, त्यानंतरही आवश्यक फॉर्म भरला गेला नाही तर नाव वगळण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते.या मोहिमेच्या तयारीसाठी निपाणी तालुक्यातील बीएलओ आणि पर्यवेक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, मतदारांची माहिती संकलित करण्याचे काम नियोजित पद्धतीने पार पाडले जाणार आहे.
५ ऑगस्टला प्राथमिक यादी
पडताळणी मोहिमेनंतर ५ ऑगस्ट रोजी प्राथमिक (कच्ची) मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यावर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान हरकती व आक्षेप नोंदविता येणार आहेत. सुनावणी व आवश्यक दुरुस्त्यांनंतर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.
ही कागदपत्रे ग्राह्य
जन्मदाखला, पासपोर्ट, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, दहावी किंवा बारावीचे प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र जन्माच्या पुराव्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. मतदारांनी बीएलओंना सहकार्य करून आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून द्यावीत, जेणेकरून मतदार यादी अचूक व अद्ययावत राहण्यास मदत होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.