

विजापूर : कमी रक्कम भरल्यास मोठ्या रकमेचे कर्ज मंजूर करुन देण्याचे आमिष दाखवत विजापूर जिल्ह्यातील शेकडो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. केवळ १५ हजार रुपये भरल्यास १५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करुन दिले जाईल, असे सांगून जिल्ह्यातील विविध गावांतील लोकांकडून पैसे गोळा करण्यात आले आहेत.
कर्ज मिळेल, या आशेने अनेकांनी रक्कम भरली. प्रत्यक्षात कर्ज न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचा आरोप संबंधितांनी केला आहे. फसवणूक करणाऱ्यांनी विजापूर शहरातील बंजारा क्रॉस येथे कार्यालय सुरु करुन लोकांचा विश्वास संपादन केला होता, अशी माहिती समोर आली आहे. फसवणूक प्रकरणातील सूत्रधार म्हणून राजपूत आणि पठाण अशी दोन नावे पुढे येत आहेत.
कर्जाच्या आशेने अनेक महिलांनी मंगळसूत्रासह सोन्याचे दागिने गहाण ठेवून पैसे भरले आहेत. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने संबंधित नागरिक हवालदिल झाले असून त्यांनी न्यायाची मागणी केली आहे. लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी संशयितांनी बनावट पावत्या, बिले तसेच बनावट बाँड पेपर्स देऊन पैसे उकळल्याचे सांगितले जात आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी फसवणूक झालेल्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.