

विजापूर : एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करुन खून केल्याची घटना मंगळवारी (दि. १५) विजापूर तालुक्यातील अंकलगीत उघडकीस आली. माळप्पा उम्मण्णा निंबाळ (वय ५७) असे मृताचे नाव आहे. राजशेखर दिंडवार व त्याचे पूत्र शिवानंद व बसवराज यांनी माळप्पा यांचा जमीन हद्द आणि रस्त्याच्या वापरावरुन झालेल्या वादातून खून केल्याचा आरोप निंबाळ यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
चार-पाच महिन्यांपूर्वी निंबाळ आणि दिंडवार कुटुंबामध्ये जमीन हद्द व रस्त्याच्या मुद्यावरुन वाद झाला होता. त्यानंतर गावातील ज्येष्ठांच्या उपस्थितीत जमीन व रस्त्याची मोजणी करुन वाद मिटविण्याचे ठरले होते. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये सलोख्याचे संबंध होते. पण, सोमवारी रात्री राजशेखर दिंडवार हा माळप्पा निंबाळ यांना शेतातील घरातून गावात घेऊन गेला होता. गणपतीचे दर्शन घेऊन येऊ, असे सांगून ते दोघे गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
पण, रात्री उशिरापर्यंत माळप्पा घरी परतले नाहीत. ते गावातच असतील, असे समजून कुटुंबीयांनी फारशी चौकशी केली नाही. मंगळवारी सकाळी कुटुंबीय शेताकडे गेले असता माळप्पा यांचा मृतदेह शेताजवळ आढळून आला. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आल्याने घटनेचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रवींद्र नायकोडी व पोलिस कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वानपथक, ठसेतज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.