

खानापूर : पर्यटकांच्या भरधाव कारची समोरुन येणाऱ्या कोंबडीवाहू टेम्पोला जोरदार धडक बसल्याने कारमधील दोघेजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनमोडजवळील गवेगाळी क्रॉसवर बुधवारी (दि. २७) मध्यरात्री दोनच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. गोडला मुरली दामोदर (वय २९) व बोया महेश नागराज (वय २५, दोघेही रा. कर्नूल, आंध्र प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत.
रामनगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशचे तीन मित्र फिरण्यासाठी गोव्याला गेले होते. बुधवारी रात्री ते अनमोडमार्गे परतीचा प्रवास करत होते. गवेगाळी क्रॉसजवळ वाहनाला ओव्हरटेक करताना त्यांची कार समोरुन येणाऱ्या टेंपोला धडकली. त्यात दामोदर व नागराज छातीला व डोक्याला गंभीर मार लागून जागीच मृत्युमुखी पडले. तर सावली शेख (रा. आंध्र प्रदेश) हा तरुण गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही वाहने बाजूला केली. जखमीला रामनगर सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी बेळगावला पाठविण्यात आले.
आंध्र प्रदेशातून मृतांचे नातेवाईक आल्यानंतर गुरुवारी सायंकाळी रामनगर सरकारी दवाखान्यात दोन्ही मृतदेहांवर शवचिकित्सा करण्यात आली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून टेम्पोतील कोंबड्याही रस्त्यावर विखुरल्या होत्या. टेम्पोमधून प्रवास करणारे एक जोडपेही जखमी झाले आहे.