Karnataka News : ‘एसआयआर’विरोधात उद्या राज्यभर आंदोलन

काँग्रेससह इंडिया आघाडीचा निर्णय
SIR voter list
SIR voter listpudhari photo
Published on: 
Updated on: 

बंगळूर : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राबविण्यात आलेल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेच्या विरोधात काँग्रेसने इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या सहकार्याने राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी ५ नोव्हेंबर रोजी जिल्हा आणि तालुका स्तरावर आंदोलन केले जाणार आहे.

मंगळवारी इंडिया आघाडीच्या कर्नाटकातील नेत्यांसोबत पत्रकार परिषद घेत केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद म्हणाले, एसआयआरला विरोध करण्यासाठी तसेच मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी देशभरातील तालुका व ब्लॉक स्तरावर आंदोलन करण्याचा निर्णय इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दिल्लीत घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी आंदोलन होईल.

सीपीएमचे राज्य सचिव के. प्रकाश यांनीही एसआयआर प्रक्रिया रद्द करावी, ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया लोकशाही पद्धतीने व्हावी व सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार निवड प्रक्रिया राबवावी, या आमच्या प्रमुख मागण्या असल्याचे म्हटले. मुख्य निवडणूक आयुक्तांना कायदेशीर कारवाईपासून कायमस्वरूपी सूट देणारा कायदाही मागे घेण्यात यावा, या मागण्यांसाठी ५ नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

भाजपचेही ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राबविण्यात आलेल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला विरोध करत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने 'लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ या घोषवाक्याखाली राज्यव्यापी अभियान सुरू केले आहे.

कोलार येथील डूमलाईट सर्कलपासून गांधी भवनपर्यंत पदयात्रा काढून भाजपने या अभियानाचा प्रारंभ केला. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झालेल्या या पदयात्रेत पक्षाचे राज्य प्रभारी हरीश द्विवेदी, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, प्रदेश भाजपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विरोधी पक्षनेते आर. अशोक सहभागी झाले होते. सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी काँग्रेसकडून षड्‌यंत्र आखले जात असल्याचा आरोप केला.