Karnataka 10th results: दहावीचा निकाल जाहीर; बेळगाव 18 तर चिकोडी 23 व्या स्थानी

दोन्ही जिल्ह्यांच्या दहावी निकालात 32 टक्क्यांची वाढ
Karnataka 10th results
Karnataka 10th resultsPudhari
Published on
Updated on

बेळगाव : बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याने निकालात मुसंडी मारताना राज्यात 25 व्या स्थानावरून 18 व्या स्थानी झेप घेतली आहे. शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल 94.75 टक्के लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 32.81 टक्क्यांची सुधारणा आहे. गतवर्षी दहावीचा निकाल केवळ 61.64 टक्के होता. चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यानेही तब्बल 32 टक्क्यांची सुधारणा करत 26 वरून 23 व्या स्थानी झेप घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्याचा एकूण निकाल 80 टक्क्यांवरून 94.1 टक्क्यांवर पोहोचला आहे. ही वाढ सुमारे 14 टक्के असून, आतापर्यंतच्या निकालाचा हा विक्रम आहे. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची प्रत मिळवण्यासाठी 28 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

यंदा बेेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातून 30,995 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी 29,241 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांची ही टक्केवारी 94.75 टक्के आहे. जिल्ह्यांच्या क्रमवारीत गतवर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्हा 25 व्या स्थानी होता. सुधारलेल्या निकालामुळे यंदा जिल्हा 18 व्या क्रमांकावर आला आहे. अथणी तालुक्यातील कटगेरी येथील सरकारी हायस्कूलची विद्यार्थिनी प्रार्थना नागाप्पा बिरादार-पाटील हिने 625 पैकी 625 गुण मिळवत बेळगाव जिल्ह्यासह राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

बिडी (ता. खानापूर) येथील होली क्रॉस कॉन्व्हेंट इंग्रजी मेडियम हायस्कूलची विद्यार्थिनी दिव्या देसाईने 625 पैकी 624 गुण घेऊन बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात पहिला तर राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. कित्तूर तालुक्यातील चन्नम्मा न्यू हायस्कूलची विद्यार्थिनी संजना अवराधी कन्नड माध्यमात 623 गुण जिल्ह्यात पहिली तर राज्यात तिसरी आली आहे. सेंट जोसेफ हायस्कूलची विद्यार्थिनी साक्षी पालणकर आणि सेंट मेरीज इंग्लिश मेडियम हायस्कूलची विद्यार्थिनी संजोता होवाल हिने 620 गुण घेऊन जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातही यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. परीक्षेला 15,927 विद्यार्थिंनी बसल्या होत्या. पैकी 15,386 विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या आहेत. 15,068 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 13,855 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

चिकोडी शैक्षणिक जिल्हा

चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याचा निकालही तब्बल 32 टक्क्यांनी वाढला असून, शैक्षणिक जिल्ह्याने जिल्ह्यांच्या क्रमवारीत तीन स्थानांनी प्रगती करत 26 वरून 23 वर झेप घेतली आहे. गेल्यावर्षी जिल्ह्याचा निकाल 61.69 टक्के लागला होता. यंदा त्यात 32.40 टक्के वाढ झाली आहे. शैक्षणिक जिल्ह्यात एकूण 41,054 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात 20,853 मुले व 20,651 मुलींचा समावेश होता. यापैकी 39,049 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात 19,104 मुले व 19,945 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यंदा मुलींनी नेहमीप्रमाणे बाजी मारली आहे.

बेळगुंदीची प्राजक्ता, बेनकनहळ्ळीची स्नेहा मराठी माध्यमात जिल्ह्यात प्रथम

बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी बालवीर विद्यानिकेतनची विद्यार्थिनी प्राजक्ता उत्तम चौगुले आणि बेळगाव मराठी विद्यानिकेतनची विद्यार्थिनी आणि बेनकनहळ्ळीची स्नेहा हिरोजी या दोघींनी 625 पैकी 615 (98.4 टक्के) गुण घेत बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात मराठी माध्यमात प्रथम क्रमांक पटकावला. बेळगुंदीच्या प्राजक्ताने ग्रामीण भागातून शिक्षण घेताना खासगी शिकवणी न लावताही फक्त शाळेतील शिक्षणाच्या जोरावर हे यश मिळवले. तिचे वडील शेतकरी आहेत. बेनकनहळ्ळीच्या स्नेहाने खो-खो खेळातही राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. तिनेही कोणतीही जादा शिकवणी न लावता शाळेतील अभ्यासावर हे यश संपादन केले आहे. पुढे विज्ञान विभागात प्रवेश घेऊन स्पर्धा परीक्षा देण्याचा मानस दोघींनीही व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news