

विजापूर : भरधाव जीपने दुचाकी तसेच टेम्पोला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना विजापूर शहरातील बागलकोट रस्त्यावर घडली. ही घटना दि. ८ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ वाजता दात्री मशिदीजवळ घडली. वीरेंद्र नेन्मल ओस्वाल (रा. इनामदार कॉलनी, विजापूर) असे मृताचे नाव आहे.
जंबगी के. डी. येथील रहिवासी तथा सध्या विजापुरात राहणारा बसवराज सदाशिव दळवाई हा जीप केंद्रीय बसस्थानकाकडून बागलकोट क्रॉसच्या दिशेने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत होता. यावेळी समोरून बागलकोट क्रॉसकडून केंद्रीय बसस्थानकाच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला जीपने जोरदार धडक दिली. त्यानंतर ही दुचाकी घेऊन पुढे जात असताना मागून येणाऱ्या टेम्पोलाही धडकली.
या अपघातात दुचाकीस्वार वीरेंद्र यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतरबीएलडीई रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच रात्री त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी महमद अनीस अब्दुलपूर बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर रहदारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.