

बंगळूर : ग्रामीण भागाच्या विकासाला राज्य सरकारने विशेष प्राधान्य दिले असून ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाला प्रथमच १६ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यापैकी पंचायत स्तरावर रस्ते, गटारी व पिण्याच्या पाण्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ६ हजार कोटी रुपये राखून ठेवण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली. ग्रामीण रस्ते संपर्क योजना व मुख्यमंत्री ग्रामीण विकास योजनांचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी ग्रामीण भागातील कामांमध्ये पारदर्शकता राखणे आवश्यक असून प्रत्येक काम करण्यापूर्वी व पूर्ण झाल्यावर त्याचे फोटो व व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणाची अचूक माहिती नोंदवावी. कोणत्याही परिस्थितीत बनावट बिलांना थारा दिला जाउ नये. लोकप्रतिनिधी व अधिकारी परस्पर संगनमत करून गैरव्यवहार होता कामा नये. १६ हजार कोटी रुपयांच्या योजना दीड वर्षाच्या आत पूर्ण कराव्यात. ‘प्रगती पथ’ योजनेसाठी ५ हजार कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. कामांसाठी निविदा प्रक्रिया अनिवार्य असून नियमांचे उल्लंघन करून कामे करण्यास परवानगी नसल्याचे म्हटले आहे.
ग्रामीण भागात रस्ते, पिण्याचे पाणी यासह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे कठीण असते. तालुका पंचायतींना पुरेसा निधी नसल्यामुळे गावांच्या विकासासाठी शहरी भागातून संसाधने आणावी लागतात. रोजगार व शिक्षणासाठी लोक शहरांकडे स्थलांतर करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातच चांगल्या सुविधा व रोजगाराच्या संधी निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तलावांमध्ये पाणी भरून भूजल पातळी वाढविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची जबाबदारी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर आहे. आरओ यंत्रांच्या देखभालीलाही प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या.
गरीब जनतेला भूखंड उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने १५ लाख भूखंडांचे वाटप करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ५ लाख भूखंड वाटप करण्यात येणार असून किमान ३० बाय ४० फूट भुखंड दिला जणार आहे. त्यामुळे दर्जेदार निवास व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. नव्याने झोपडपट्ट्या निर्माण होता कामा नये, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक तालुक्यात ई-खाता देताना मालमत्तेचे छायाचित्र व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करूनच दिले जावे, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.