

बेळगाव, बंगळूर : राज्यात लोकायुक्त पोलिसांनी बेळगावसह चार जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकून, निर्धारित उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमा केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचे अवैध कृत्य उघडकीस आणले आहे. विश्वसनीय माहितीच्या आधारे, लोकायुक्त पोलिसांनी बेळगाव, बळ्ळारी, चित्रदुर्ग आणि म्हैसूरसह राज्यातील अनेक ठिकाणी छापे टाकून 8 अधिकाऱ्यांना अटक केली.
लोकायुक्तांच्या अधिकाऱ्यांनी सापळ्यात अडकलेल्या 8 अधिकाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची रोकड, दागिने आणि चैनीच्या वस्तू जप्त केल्या असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चित्रदुर्गातील निर्मिती केंद्रातील माजी लेखापाल सुशीलम्मा यांच्या घरावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकला. सुशीलम्मा यांना वर्षभरापूर्वी व्हीआरएस मिळाला होता. यांच्यावर लेखापाल म्हणून काम करत असताना भ्रष्टाचार केल्याचा आणि आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त पैसा व मालमत्ता जमा केल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी चित्रदुर्ग जिल्ह्यातील मेदेहळ्ळी ब्लॉकमधील त्यांच्या घरावर आणि हिरियूर तालुक्याच्या यादलघट्टा गावातील त्यांच्या फार्महाऊसवर छापा टाकला आहे.
बळ्ळारी येथील मत्स्य विभागाचे सहाय्यक संचालक शिवण्णा यांच्या घर आणि कार्यालयावर छापा टाकला आहे. कार्यालय आणि सिद्धार्थ नगर येथील घरासह एकूण चार ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. शिवण्णा यांच्या विरोधात अनेक आरोपांखाली तक्रारी होत्या. उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरून हा छापा टाकण्यात आला. अधिकारी शिवण्णा वापरत असलेल्या सरकारी बोलेरो कारचीही तपासणी केली जात आहे.