

जमखंडी : थांबलेल्या कारमध्ये प्रचंड स्फोट झाल्याची घटना जमखंडी तालुक्यातील हिप्परगी येथे शनिवारी रात्री घडली. हिप्परगी येथील युवराज वाईन शॉपजवळ स्फोट होऊन कारचा चेंदामेंदा झाला. सुदैवाने यात कोणतीही प्राणहानी झाली नाही. कारचे अवशेष सुमारे २०० मीटर अंतरापर्यंत विखुरले गेले. या घटनेत कारचे अवशेष लागल्याने एक व्यक्ती जखमी झाला.
युवराज वाईन शॉपचे मॅनेजर हनुमंत सावगोंडा वाईन शॉप बंद करून कारने घरी जाण्याच्या तयारीत असताना स्फोट झाला. अचानक झालेल्या या स्फोटामुळे दुकानाच्या छताचे पत्रे उडाले. परिसरात हादरा बसला यात कारचा चेंदामेंदा झाला आहे. याबाबत त्यांनी त्वरित जमखंडी पोलिस ठाण्याला ही माहिती दिली.
घटनास्थळी जमखंडीचे डीवायएसपी सय्यद रोशन जमीर, सीपीआय मल्लाप्पा मड्डी, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पीएसआय गंगाधर पुजारी यांनी भेट देऊन पाहणी केली. स्फोटाचे कारण कळले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.
कारमध्ये झालेल्या स्फोटाचा तपास करण्याकरता बागलकोट येथून बॉम्ब स्क्वॉड पथक पाचारण करण्यात आले आहे. या स्फोटात कारचे तुकडे उंच झाडावर आढळून येत असून परिसरात गाडीचे अवशेष विखुरले आहेत. या स्फोटानंतर परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला असून नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. कार पार्क केलेल्या ठिकाणी सीसी कॅमेरा असून त्याचे फुटेज तपासले जात आहे. घटनास्थळी बॉम्ब निष्क्रिय पथक, श्वानपथक यांना प्राचारण करण्यात आले असल्याची माहिती बागलकोटचे जिल्हा पोलिस प्रमुख सिद्धार्थ गोयल यांनी दिली.
कार स्फोटामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. हा तांत्रिक बिघाड होता, शॉर्टसर्किट होते की आणखी काही कारण होते, याचा तपास पोलिस आणि तज्ज्ञांचे पथक करत आहे. तपास अहवाल आल्यानंतरच स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.