

बंगळूर : घर खरेदीदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून ईडी अधिकाऱ्यांनी ओझोन ग्रुपशी संबंधित ७०२.७० कोटी रुपये किमतीची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. या मालमत्तांमध्ये सदनिका व जमिनींचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य पोलिस विभाग व सीबीआयने दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यांच्या एफआयआरच्या आधारे ईडीचे अधिकारी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत तपास करीत आहेत.
सबव्हेन्शन, बायबॅक व झिरो डाउन पेमेंट यांसारख्या आकर्षक योजनांच्या माध्यमातून ग्राहकांकडून पैसे गोळा करणाऱ्या ओझोन ग्रुपने ॲक्वा-२, ॲव्हेन्यू, प्राइम, मेट्रोझोन, डब्ल्यूएफ-४८ व पोलस्टार या प्रकल्पांतील सदनिका ग्राहकांना ताब्यात न देता तसेच भरलेले पैसेही परत न करता १ हजार ३०५.११ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ग्राहकांकडून गोळा केलेली रक्कम संबंधित इमारतींच्या बांधकामासाठी वापरण्याऐवजी इतर कंपन्यांकडे वळविण्यात आली. तसेच कर्जाची परतफेड व कॉर्पोरेट खर्चासाठी या पैशांचा वापर करण्यात आल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
यापूर्वी ४ ऑक्टोबररोजी ४२३.३७ कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. आता आणखी ७०२.७० कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आल्याने एकूण १ हजार १२६ कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती ईडीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.