Karnataka Marathi Teacher Recruitment: मराठी शिक्षक भरतीच्या पाठपुराव्याला यश

जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडून पत्र : युवा समिती सीमाभागकडून ८०० जागांची मागणी
Teacher Recruitment
Teacher Recruitment pudhari photo
Published on
Updated on

बेळगाव : सरकारच्या प्राथमिक शिक्षक भरती प्रक्रियेत मराठी आणि उर्दू माध्यमांना डावलण्यात आल्याच्या मुद्यावर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाने समितीच्या निवेदनांची दखल घेत ती पुढील कार्यवाहीसाठी शिक्षण खात्याच्या मुख्य सचिवांकडे पाठविली आहेत.

सरकारने प्राथमिक शिक्षकांच्या सुमारे १५ हजार रिक्त जागांच्या भरतीसाठी १२ ऑगस्ट २०२६ रोजी अधिसूचना जारी केली होती. मात्र, बेळगाव जिल्ह्यातील भरतीमध्ये मराठी आणि उर्दू माध्यमातील उमेदवारांना अपेक्षित प्रतिनिधित्व नसल्याने पात्र उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने १३, १४ आणि १८ ऑगस्ट रोजी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे निवेदने सादर केली. मराठी आणि उर्दू माध्यमातील पात्र उमेदवारांनाही शिक्षक भरतीमध्ये योग्य संधी द्यावी, आवश्यक सुधारणा करून सुधारित अधिसूचना काढावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली होती. मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.

१८ ऑगस्ट रोजीच्या जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या पत्रातून संबंधित निवेदनांचा आणि समितीने केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ही निवेदने पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी कर्नाटक सरकारच्या शिक्षण खात्याकडे बंगळूरला पाठविल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. मराठी माध्यमासाठी २०० जागा अपुऱ्या असून ८०० ते ९०० शिक्षकांच्या जागा मंजूर कराव्यात, अशी पात्र उमेदवारांची मागणी आहे. मराठी माध्यमाच्या जागांमध्ये वाढ करण्यासाठीही पाठपुरावा सुरु आहे.

सुधारित अधिसूचनेकडे लक्ष

जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाने समितीच्या निवेदनांची दखल घेऊन ती राज्याच्या शिक्षण खात्याकडे पाठवल्याने मराठी भाषिक आणि शिक्षक भरतीसाठी पात्र डीएड, बीएड उमेदवारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आता मराठी माध्यमाच्या शिक्षकांच्या जागांमध्ये वाढ करुन सुधारित अधिसूचना कधी जारी होणार, याकडे सीमाभागातील मराठी भाषिकांसह हजारो पात्र उमेदवारांचे लक्ष लागले आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news