

बंगळूर : मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात मातेसह तिची दोन मुले जिवंत गाडली गेली. ही घटना मंगळूर येथील कंकनाडी येथील नागुरीजवळ घडली. मृत झालेले सर्वजण मूळचे बिहारचे असून मंगळूरमध्ये बांधकाम मजूर म्हणून काम करत होते.
मंगळूर परिसरात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. सततच्या पावसामुळे, नागुरीतील कंकनाडी शहर पोलिस स्टेशनजवळच्या एका जुन्या घरावर जवळच्या डोंगरावरून मातीचा ढिगारा कोसळला. यामध्ये तिघेजण गाडले गेले.
अचानक झालेल्या भूस्खलनामुळे घरातील चौघेजण क्षणार्धात ढिगाऱ्याखाली अडकले. यामध्ये आई आणि दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी आणि बचाव पथकाने घरातील उर्वरित लोकांना सुखरूप बाहेर काढले.
या घटनेची बातमी कळताच अग्निशमन दल, एसडीआरएफ आणि पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साहाय्याने घरावर कोसळेला मातीचा ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. मुसळधार पावसात बचाव पथके बचावकार्य करत आहेत.