Kali Tiger Reserve: काळी प्रकल्पातील व्याघ्रसंख्या स्थिर

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन विशेष: अंदाजे ३० वाघांचा वावर ; नजीकच्या जंगलातही वाघांचा आढळ वाढला
Kali Tiger Reserve: काळी प्रकल्पातील व्याघ्रसंख्या स्थिर
Published on
Updated on
वासुदेव चौगुले

खानापूर : कारवार जिल्ह्यातील पश्चिम घाटावर वसलेल्या दांडेली काळी व्याघ्र प्रकल्पात (केटीआर) वाघांची संख्या स्थिर असल्याचे अलीकडील निरीक्षण अहवालांतून समोर आले आहे. दांडेली वन्यजीव अभयारण्य आणि अनशी राष्ट्रीय उद्यानाचा समावेश असलेल्या या व्याघ्र प्रकल्पात सध्या ३० हून अधिक वाघांचे अस्तित्व असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

जानेवारी महिन्यात झालेल्या राज्यव्यापी व्याघ्र गणनेत वन खात्याकडून वाघांच्या अधिवासाचे व्यापक सर्वेक्षण हाती घेण्यात आले होते. लवकरच ही आकडेवारी जाहीर केली जाणार असून दांडेलीच्या व्याघ्र वैभवात भर पडण्याची आशा वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. सुमारे १,३०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेल्या काळी व्याघ्र प्रकल्पाला देशातील महत्त्वाच्या व्याघ्र अधिवासांपैकी एक मानले जाते. काळी नदीच्या खोऱ्यातील सदाहरित पानझडी व अर्धसदाहरित जंगलांमुळे या परिसरात जैवविविधतेची समृद्ध परंपरा आहे. वाघांसह बिबट्या, हत्ती, गवा, सांबर, अस्वल आणि विविध पक्षी प्रजातींसाठी हे जंगल सुरक्षित अधिवास मानले जाते.

येथील व्याघ्र गणनेसाठी वनखात्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. जंगलातील विविध भागांत कॅमेरा ट्रॅप बसवून वनरक्षकांकडून पाऊलखुणा, विष्ठा आणि इतर जैविक पुराव्यांचे संकलन करण्यात आले आहे. या माहितीच्या आधारे वाघांची अचूक संख्या, त्यांची हालचाल, प्रजनन स्थिती आणि अधिवासाचा अभ्यास करण्यात आला आहे. व्याघ्र गणनेसाठी काळी व्याघ्र अभयारण्यात ४५० कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला होता.

वनखात्याच्या अहवालानुसार गेल्या काही वर्षांत काळी व्याघ्र प्रकल्पात राबविण्यात आलेल्या कठोर शिकारीविरोधी मोहिमा, अधिवास संवर्धन आणि वन्यजीव संरक्षण उपाययोजनांमुळे वाघांची संख्या वाढण्यास आणि स्थिर राहण्यास मदत झाली आहे. जंगलातील पाणवठ्यांचे संवर्धन, गस्त वाढविणे आणि स्थानिक समुदायांचा सहभाग यामुळे व्याघ्र संवर्धनाला बळ मिळाले आहे.

अलीकडील कॅमेरा ट्रॅप सर्वेक्षणातून काही वाघ काळी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेबाहेरील जंगल भागात स्थलांतरित होत असल्याचेही आढळून आले आहे. विशेषतः अंकोला, कारवार परिसरातील जोडलेल्या वनक्षेत्रांमध्ये या वाघांची हालचाल नोंदविण्यात आली आहे. यामुळे काळी व्याघ्र प्रकल्प हा केवळ वाघांसाठी सुरक्षित अधिवास नसून पश्चिम घाटातील इतर जंगलांना वाघांचा पुरवठा करणारा महत्त्वाचा स्रोत प्रदेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news