

उगार खुर्द : येथील गांधी चौक परिसरात बंद घर फोडून अंदाजे १० तोळ्यांहून अधिक सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गांधी चौक येथील गजानन सुभाष न्हावी हे कुटुंबासह २९ तारखेला गावी गेले होते. ३० तारखेला सायंकाळी घरी परतल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले दिसून आले. घरात प्रवेश केल्यानंतर तिजोरी फोडण्यात आल्याचे आणि त्यामधील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले असल्याचे निदर्शनास आले.
तिजोरीतील अंदाजे १० तोळ्यांहून अधिक सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले आहे. घटनेची माहिती मिळताच कागवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पुढील तपासासाठी बेळगाव येथून ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत चौकशीचे काम सुरू होते. बंद घरांना चोरट्यांकडून लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कागवाड पोलिस उपनिरीक्षक खोत पुढील तपास करत आहेत.