Karnataka News : दसरा मिरवणूक वैभवशाली

६० चित्ररथांचे आकर्षण, लाखोंची गर्दी; केरळम्, तेलंगणचे मुख्यमंत्रीही सहभागी
Karnataka News : दसरा मिरवणूक वैभवशाली
Published on: 
Updated on: 

म्हैसूर : जगप्रसिध्द म्हैसूर दसऱ्याचे प्रमुख आकर्षण असलेल्या अंबारी मिरवणुकीत बुधवारी लाखो लोकांनी सहभागी होऊन विजयादशमी साजरी केली. केंद्र सरकार, राज्य सरकार, राज्यातील ३१ जिल्हे आणि बेळगावच्या केएलई संस्थेसह एकूण ६० लक्षवेधी चित्ररथ हे मिरवणुकीचे आकर्षण होते.

केरळम्‌चे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन, तेलंगणचे मुख्यमंत्री के. रेवंथ रेड्डी तसेच कन्नड सिनेताऱ्यांचा सहभाग हे यंदाच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दुपारी चामुंडेश्र्वरी देवीची पूजा करून देशात तसेच राज्यात पाऊस आणि पीक-पाणी चांगले होऊ दे, अशी प्रार्थना करत दुपारी मिरवणुकीचे उद्‌घाटन केले. सायंकाळी कंकण विसर्जन होऊन मिरवणुकीची सांगता झाली.

अठराव्यांदा दसऱ्याच्या जंबो सवारीत सहभागी झालेल्या प्रशांत हत्तीने पहिल्यांदाच देवी चामुंडेश्वरीची मूर्ती असलेली ७५० किलो वजनाची सुवर्ण अंबारी म्हैसूर राजवाड्यासमोरून बन्नी मंटपापर्यंत वाहून नेली. यापूर्वी सहा वेळा अंबारी वाहून नेलेल्या अभिमन्यू हत्तीने यंदा निशाण हत्तीची भूमिका बजावली. दुपारी १.३६ ते १.५० या मुहूर्तावर मुख्यमंत्री शिवकुमार व उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी नंदीध्वजाची पूजा करून मिरवणुकीला सुरुवात केली. ६० चित्ररथ सहभागी झाले होते. विविध जिल्ह्यांचा सांस्कृतिक, लोककलेचा वारसा सादर करण्यात आला.

सायंकाळी ४.१० ते ४.३५ या मुहूर्तावर मुख्यमंत्री शिवकुमार, उपमुख्यमंत्री परमेश्वर, नगर विकास मंत्री डॉ. यतींद्र सिद्धरामय्या व कन्नड-संस्कृती मंत्री शिवराज तंगडगी यांनी सुवर्ण अंबारीतील चामुंडेश्वरी देवीची पुष्पार्चना केली. सरकारी निमंत्रणावरून म्हैसूरला आलेले केरळम्‌चे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन व तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनीही राजवाड्याच्या मैदानासमोर चामुंडेश्वरी देवीची पुष्पार्चना करून अभिवादन केले. सायंकाळी ४.३५ वाजता अंबाविलास राजवाड्यातून जंबो सवारीला सुरुवात झाली. मिरवणुकीत सांस्कृतिक पथकांच्या सादरीकरणाला टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद मिळाला. मिरवणूक सुरू होताच प्रमुख चौकांमध्ये जमलेल्या नागरिकांनी बॅरिकेडस्‌ ढकलून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. चामराजेंद्र चौक, के. आर. चौक, देवराज मार्केट व आयुर्वेदिक चौकात गर्दीने उच्चांक गाठला. गर्दीत अडकलेल्या महिला व मुलांना पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढून बॅरिकेडस्‌च्या पलीकडे बसवले. तर काही अस्वस्थ झालेल्या महिलांना रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राजवाड्यात पूजा

म्हैसूरच्या राजघराण्याचा दसराही आकर्षण ठरला. अंबाविलास राजवाड्यात राजपरंपरेनुसार धार्मिक विधी व पूजा पार पडल्या. राजघराण्याचे वंशज तथा खासदार यदुवीर कृष्णदत्त चामराज वडेयर यांनी राजवस्त्रे परिधान करून पूजा केली. भुवनेश्वरी मंदिरात शमी वृक्षाची पूजा करून विजययात्रा काढण्यात आली. शस्त्रपूजा व रथपूजेनंतर सायंकाळी कंकण विसर्जनाने दसरा उत्सवाची सांगता झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news