

बेळगाव ः राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये मुलांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी पाण्याची घंटा वाजवण्याची सूचना शिक्षण खात्याने दिली आहे. तसे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
मुले अतितहान लागल्याशिवाय पाणी पित नाहीत, असे एका पाहणीत आढळून आले. परिणामी, मुलांच्या शरीरात पुरेसे पाणी नसते. ते मिळावे, यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. पीएम पोषणशक्ती निर्माण योजनेच्या संचालकांनी हे परिपत्रक जारी केले आहे. मुले शाळेत पाण्याची बाटली घेऊन जातात; पण पाणी पित नाहीत. त्यामुळे मुलांमध्ये आजारांचे प्रमाणही वाढले आहे. डॉक्टर सांगतात की, पाणी भरपूर प्यावे. पण, त्या सल्ल्याचे पालन केले जात नाही. शिवाय, पावासाळा-हिवाळ्यात शाळांमध्ये मुलांना वारंवार पाणी पिण्याची गरजही भासत नाही. म्हणूनच त्यांना पाणी पिण्याची आठवण करून देणे आवश्यक आहे.
मुलांच्या योग्य वाढीसाठी तसेच अन्नपचनासाठी पिण्याचे पाणी आवश्यक आहे. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यातही पाणी मदत करते. अनेक आजारांना प्रतिबंध करण्यासही पाणी सहायक ठरते. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तीन वेळा बेल
दिवसांतून तीनदा पाण्याची बेल वाजवण्याची सूचना शाळांना देण्यात आली आहे. त्यानुसार शाळांना अंमलबजावणी करावी लागणार आहे.