

बेळगाव : राज्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये हिजाबसह धार्मिक चिन्हे परिधान करण्यावर 2022 पासूनअसलेली बंदी कर्नाटक सरकारने उठवली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना आता हिजाब, जानवे, रुद्राक्ष, पगडी ही धार्मिक वस्त्रे गणवेशासह परिधान करता येणार आहेत.
२०२२ मध्ये तात्कालीन सरकारने लागू केलेला हिजाब बंदीचा आदेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मागे घेतला. शिक्षण हे विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासाठी आणि संवैधानिक मूल्यांच्या जपणुकीसाठी पूरक असावे. धर्मामुळे शिक्षणात अडथळा येऊ नये. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.
राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित शाळा, महाविद्यालये आणि पदवीपूर्व महाविद्यालयांना हा आदेश लागू असेल. एसडीएमसींनी या आदेशाची काटेकोरपणे पालन करावे, असे शिक्षण मंत्री मधू बंगारप्पा यांनी सांगितले.
रूद्राक्ष, पगडीलाही परवानगी
नव्या आदेशामुळे शाळा, महाविद्यालयांनी निश्चित केलेल्या गणवेशास पूरक अशा पारंपरिक धार्मिक प्रतीकांना परवानगी दिली आहे.