

बेळगाव : केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात राबविलेली मतदारयादी दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण झाली असून, आयोगाने अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार राज्यातील एकूण १ कोटी ०७ लाख ९६ हजार ३३९ मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. सुमारे ७ लाखांहून अधिक बनावट किंवा दोन ठिकाणी नावे असलेल्या मतदारांच्या नोंदी रद्द करण्यात आल्या आहेत. तर बेळगाव जिल्ह्यात एसआयआर प्रक्रियेनंतर तब्बल ४ लाख ७१ हजार १४० मतदार वगळण्यात आले आहेत. त्यानुसार आता जिल्ह्यातील मतदारसंख्या ३६ लाख ३५ हजार ८६० आहे.
बेळगाव जिल्हा प्रशासन तथा जिल्हा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. २७) अंतिम मतदारयादी जाहीर केली आहे. त्यानुसार एसआयआर प्रक्रियेआधी जिल्ह्यातील मतदारसंख्या ४१ लाख सात हजार होती. एसआयआर प्रक्रियेच्या प्रारूप मतदारयादीत ५ लाख १३ हजार ४३९ मतदारांना वगळण्यात आले. त्यामध्ये १ लाख ३४ हजार ९०३ मृत, २ लाख ८३ हजार २४९ स्थलांतरित, ६८ हजार ६०६ इतर ठिकाणी नोंद आणि २६ हजार ४५९ मतदार बेपत्ता होते. त्यानंतर आलेल्या आक्षेपांवर सुनावणी होऊन अंतिम यादी जाहीर करण्यात आली.
अंतिम यादीनुसार जिल्ह्यात १८ लाख २५ हजार ५३१ पुरुष मतदार, १८ लाख १० हजार १७० महिला आणि १५९ तृतीयपंथी मतदार आहेत. जिल्ह्यातील १८ मतदारसंघांपैकी बेळगाव ग्रामीण मतदारसंघात सर्वाधिक २ लाख ३८ हजार ४२२ मतदार आहेत. तर सर्वात कमी कुडची मतदारसंघात १ लाख ७६ हजार २१४ मतदार आहेत. प्रारूप मतदारयादीत जिल्ह्यातील ५ लाख १३ हजार ४३९ मतदारांना वगळण्यात आले होते. त्यामध्ये आलेले आक्षेपांवर सुनावणी होऊन ४२ हजार २९९ मतदारांना पुन्हा सामावून घेण्यात आले आहे. या अंतिम मतदारयादीबाबत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन माहिती दिली आहे.