Bendur festival Karnataka: बेंदरासाठी बळीराजाची लगबग
निपाणी : कर्नाटकी बेंदूर सण चार दिवसावर दिवसांवर आला असून यांत्रिकिकरणातही बैलांच्या कष्टाचे महत्त्व टिकून असल्याने शेतकर्यांना बेंदूर सणाची उत्सुकता लागून राहिली आहे. शेतकर्यांसह लहान मुलांना बेंदूर सण म्हणजे एक पर्वणीच असते. सणानिमित्त स्वच्छता, रंगरंगोटी, कुंभार बांधवांकडून चिखलाचे बैल तयार करण्यासाठी लगबग सुरु आहे.
बेंदूर सण विशेषत: ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध आकाराचे लहान-मोठे चिखलाचे बैल तयार करुन शिंगांना चुन्यासह विविध रंग लावण्यासाठी बालचमू एकत्र येत आहेत. पूर्वी गल्लीबोळातील लहान मुले एकत्र येऊन एक गट तयार करुन हाताला कडूलिंबाचा पाला बांधत दोरीने कर तोडणार्या बैलासारखे मान हलवित रस्त्यावरुन धावत सुटायचे. पण सध्या असे चित्र पाहणे दुर्मीळ बनत चालले आहे.
बेंदूर सणादिवशी करतोडणी पाहण्यासाठी गर्दी होते. शेतकरी नदी, विहिरी, नाल्यावर जाऊन जनावरांना आंघोळ घालत त्यांना सजवितात. बैलांना पुरण पोळीचा नैवेद्य दाखविण्यात येतो. चिखलांच्या बैलांचे घरोघरी पूजन केले जाते. सध्या वाढत्या महागाईने बैलांचा सांभाळ करणेही त्रासाचे होत आहे. आधुनिक काळात बहुतेक सणांचा विसर पडत आहे.
बेंदूर सणानिमित्त शेतकरी लोणी, हळद एकत्र करून बैलांचा खांदा चोळतात तसेच गरम पाण्याने पाय धुतले जातात. शाळूचा खिचडा खायला दिला जातो. बेंदरादिवशी बैलाला सजविले जाते. पूर्वीपासून शेतकर्यांनी ही परंपरा जपली आहे.
धोंडिबा चिखले, शेतकरी, सौंदलगा

