

बंगळूर ः मद्य विक्री दुकानाच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी 25 लाख रुपयांची लाच घेताना अबकारी खात्याच्या आयुक्तांसह अधीक्षक व कॉन्स्टेबलला लोकायुक्त पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणाने अचानक वळण घेतले असून, त्याचे धागेदोरे थेट उत्पादन शुल्क मंत्री आर. बी. तिम्मापूर यांच्यापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे हे प्रकरण राज्य सरकारसाठी संकट बनण्याची शक्यता आहे.
लक्ष्मीनारायण नावाच्या एका व्यावसायिकाने त्यांच्या मद्यविक्री दुकानाच्या परवान्याचे नूतनीकरण आणि मद्यनिर्मिती सुरू करण्याची परवानगी मिळावी, यासाठी अर्ज दाखल केला होता. अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी तो वेळेच्या आत निकाली काढला नाही. त्यामुळे, लक्ष्मीनारायण यांनी अबकारी आयुक्तांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांच्याकडे 80 लाख रुपयांची लाच मागण्यात आली. 25 लाख रुपयांच्या पहिल्या हप्त्याबद्दल चर्चा झाली. लक्ष्मीनारायण यांनी ही बाब लोकायुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार लोकायुक्तांनी सापळा रचला. सर्व काही नियोजनानुसार झाले. लाचेचे पैसे घेत असताना लोकायुक्त पोलिसांनी छापा टाकून अबकारी आयुक्त जगदीश, अधीक्षक के. एम. थम्मण्णा आणि कॉन्स्टेबल गणी यांना अटक केली. अटक केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
लोकायुक्त पोलिसांनी त्यांची कस्टडी घेऊन चौकशी केली असता त्यांनी अबकारी मंत्री तिम्मापूर यांनाही या लाचखोरी प्रकरणात वाटा देण्यात येणार आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे, संपूर्ण प्रकरणाला एक नवीन वळण मिळाले आहे. याव्यतिरिक्त, लाचखोरीबाबत तक्रार दाखल करणारे लक्ष्मीनारायण यांनीही अबकारी मंत्र्यांना लाच दिल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे, पोलिसांना आता त्यादृष्टीने तपास सुरु केला आहे. या प्रकरणामुळे सरकारसमोर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.