Satish Jarkiholi ED Raid: जारकिहोळींच्या मागे ‘ईडी’पिडा

मंत्री सतीश जारकिहोळी, खासदार प्रियांका जारकिहोळी यांच्या निवासस्थानांसह निकटवर्तीयांवर ईडीचे छापे; कर्नाटकसह महाराष्ट्रातही कारवाई
Satish Jarkiholi
Satish JarkiholiPudhari
Published on
Updated on

बंगळूर : कर्नाटकातील प्रभावी काँग्रेस नेते, डी. के. शिवकुमार सरकारचे किंगपीन तथा सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकिहोळी, त्यांच्या पुत्री खासदार प्रियांका जारकिहोळी यांना आता ईडीने लक्ष्य केले आहे. या दोघांच्या निवासस्थानांसह त्यांच्या निकटवर्तीयांवर बुधवारी (दि. ९) पहाटे एकाचवेळी छापे टाकण्यात आले.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी बंगळूरमधील कार्यालयासह बेळगाव, गोकाक, मुंबई व पुण्यातील निवासस्थानांवर छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे समजते. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातही यासंबंधी काहीजणांची चौकशी सुरू आहे. बेकायदेशीर परकीय गुंतवणूक आणि मनी लाँडरिंगच्या आरोपांवरून ही कारवाई करण्यात आली.

ईडीने मंत्री जारकिहोळी यांच्या विरोधात परकीय चलन व्यवस्थापन (फेमा) कायद्याच्या उल्लंघनाबद्दल ईसीआयआर दाखल केला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी मंत्री जारकिहोळी यांचे मेहुणे मंजुनाथ, निकटवर्तीय डॉ. गिरीश सोनवलकर, राजू दरगशेट्टी आणि विठ्ठल परसण्णावर यांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवरही छापे टाकले. निकटवर्तीयांच्या घरांच्या तपासणी दरम्यान महत्त्वाची कागदपत्रे सापडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यांचे मेहुणे वाय. मंजुनाथ यांच्यावरील उत्पादन शुल्क घोटाळाप्रकरणी हे छापे टाकण्यात आल्याची चर्चा सुरुवातीला होती. परंतु, या छाप्यांचा उत्पादन शुल्क घोटाळ्याशी काहीही संबंध नसल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मंत्री जारकिहोळी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी परदेशात केलेली गुंतवणूक, विविध गुंतवणूक करार आणि आर्थिक व्यवहारांवरून हे छापे टाकण्यात आले आहेत. ही कारवाई फेमा-१९९९ अंतर्गत एका वेगळ्या प्रकरणाशी संबंधित असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

मंत्री जारकिहोळी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दक्षिण आफ्रिका आणि युगांडासह विविध देशांमध्ये अवैध गुंतवणूक केल्याचा संशय आहे. त्या पार्श्वभूमीवर तपास सुरू आहे. मंत्री जारकिहोळी यांच्याकडून गुंतवणूक करण्यात आली आहे का, याची तपासणी केली जात आहे. अलीकडेच रवांडा देशातील उद्योजकांनी मंत्री जारकिहोळी यांच्या गोकाकमधील निवासस्थानाला भेट देऊन त्यांच्या साखर कारखान्यांविषयी माहिती घेतली होती. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रवांडामध्ये खाण उद्योग आणि साखर कारखाना उभारण्यासंदर्भात त्यांनी चर्चा करून काही करार केले होते, असे सांगण्यात येत आहे.

जारकिहोळींची यापूर्वीच टीका

ईडी छाप्यांबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकिहोळी यांनी जून महिन्यात त्यांच्या नातलगांवर पडलेल्या छाप्यांवर बोलताना ईडीवर टीका केली होती. ईडी कुणाच्या इशाऱ्यावर काम करते, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे अशा छाप्यांवर मी फार बोलणार नाही, अशी टीका त्यांनी केली होती. त्यानंतर आता त्यांच्यावरच ईडीचे छापे पडले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news