

बंगळूर : नेतृत्व बदलाच्या मुद्यावरून राज्य काँग्रेसमध्ये गोंधळ सुरूच असून हालचाली गतिमान झाल्या आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे ऊर्जा मंत्री के. जे. जॉर्ज यांनी शुक्रवारी (दि. 16) रात्री दिल्लीत खासदार गांधी यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी बुधवारी (दि. 21) दिल्लीला रवाना होत असून खासदार गांधींना भेटणार आहेत. उपमुख्यमंत्री शिवकुमार नेतृत्वबदलासाठी आग्रही आहेत. आसाम विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यामुळे ते दोन दिवसांपूर्वी दिल्लीत आले न निवडणूक रणनीती बैठकीला उपस्थित राहिले. या काळात त्यांनी खासदार गांधींशी स्वतंत्रपणे बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते शक्य झाले नाही. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भीमण्णा खंड्रे यांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी ते बिदरला आले होते. तेथून ते पुन्हा दिल्लीला रवाना झाले. प्रदेश काँग्रेसच्या परिस्थितीबद्दल त्यांची खासदार गांधी आणि राष्ट्रीय सरचिटणीस वेणुगोपाल यांच्याशी बोलण्याची तयारी सुरू आहे.
दरम्यान, दिल्लीत आलेले ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांनी शुक्रवारी रात्री खासदार गांधी यांची भेट घेऊन दीर्घकाळ चर्चा केली. केरळ विधानसभा निवडणुकीचे प्रभारी असलेल्या जॉर्ज यांनी कर्नाटकातील घडामोडींबद्दल त्यांच्याशी चर्चा केली आहे. केरळ विधानसभा निवडणुका संपेपर्यंत राज्यात कोणताही गोंधळ निर्माण करू नये आणि सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री म्हणून कायम ठेवावे, अशी विनंती केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जारकीहोळीही दिल्लीला जाणार
दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निकटवर्तीय मंत्र्यांशी आणि आमदारांशी बंगळूरमध्ये सल्लामसलत करत आहेत. हायकमांडशी चर्चा करण्यासाठी ते बुधवारी दिल्लीला रवाना होत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.