

धारवाड : स्विफ्ट कार व कँटरमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत एका महिलेसह चौघे जागीच ठार झाले. नवलगुंद तालुक्यातील अमरगोळजवळ (जि. धारवाड) शुक्रवारी (दि. ९) सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांमधील तिघे विजापूर जिल्ह्यातील तर महिला शिमोगा जिल्ह्यातील आहे.
राकेश अनिल भोसले (वय २२), संदीप गणेश शिंदे (वय ३३, दोघेही रा. बारडोली, ता. चडचण, जि. विजापूर), चालक अजितप्रभू अल्लापूर (वय ३८, रा. मादगाव, ता. बसवण बागेवाडी, जि. विजापूर) आणि श्रुती नवीनकुमार (वय २८, रा. शिरवळ, ता. सागर, जि. शिमोगा) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, स्विफ्ट कारमधून (केए ४३ ए ६५३४) वरील चौघेजण हुबळीहून विजापूरच्या दिशेने चालले होते. अमरगोळ गावाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या कँटरने कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की कारचा चक्काचूर झाला. त्यात कारमधील चौघेही जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच नवलगुंद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तालुका रुग्णालयात पाठविले.