Karnataka Government : मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठवड्यात

मंत्र्यांची यादी हायकमांडकडे; बेळगावातून केवळ सवदींचे नाव?
DK Shivakumar Cabinet
DK Shivakumar
Published on
Updated on

बंगळूर : येत्या आठवड्यापर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतलेल्या मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी शुक्रवारी काँग्रेस हायकमांडकडे संभाव्य मंत्र्यांची यादी सादर केली असून मंजुरी मागितली आहे. यादीत एकूण १४ नावे असून, तीत बेळगाव जिल्ह्यातून केवळ लक्ष्मण सवदी यांचे नाव असल्याचे समजते. त्यामुळे माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना विस्ताराच्या दुसऱ्या यादीतही स्थान मिळालेले नसून, तिसऱ्या यादीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मंत्रिमंडळात एकूण ३४ जणांना स्थान मिळू शकते. पैकी पहिल्या टप्प्यात १४ जणांनी शपथ घेतली होती. दुसऱ्या टप्प्यातही १४ नावे असून, सहा जागा रिक्त राहतात.

मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेले. तेथे त्यांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत कर्नाटकाच्या विकासासाठी निधी आणि प्रलंबित योजनांना मंजुरीची मागणी केली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबात त्यांनी सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियांका गांधी, के. सी. वेणुगोपाल यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली आहे.

मुख्यमंत्र्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व सोनिया गांधी यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत माहिती दिली असून संभाव्य उमेदवारांची यादीही सादर केली आहे. राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री शिवकुमार यांनी दिलेल्या यादीचा आढावा घेऊन मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा करूनच निर्णय खेणार असल्याचे कळते. मंत्रिमंडळात तरुण आमदारांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे म्हटले जाते. यादी सादर केल्यानंतर मुख्यमंत्री शिवकुमार बंगळूरला परतले आहेत.

मुख्यमंत्री शिवकुमार यांनी हायकंमाडने दिलेल्या सूचनांनुसार सर्व कामे होणार असून आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पुन्हा सत्तेत आणणे ही आपली जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सर्व प्रदेश, समुदाय व वर्गांना प्राधान्य देण्यात आले असल्याचे कळते.

खातेवाटप

खातेवाटप करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करून एकमताने निर्णय घ्यावा, असे म्हटले होते. पक्षीय व प्रशासकीय निर्णयांमध्ये एकतर्फी निर्णय घेऊ नयेत. सर्वांनी एकमताने निर्णय घ्यावा व सहकार्याने काम करावे, अशा सूचनाही शिवकुमारांना हायकमांडकून देण्यात आल्या.

पु्न्हा वादंग नको : राहुल गांधी

पहिल्या यादीतील मंत्र्यांमध्ये खातेवाटपावरून आक्षेप घेतलेल्या मंत्र्याबद्दल नाराजी व्यक्त करत भविष्यात असा वाद निर्माण होणार नाही, याची खात्री करावी, असा सल्ला राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री शिवकुमार यांना दिला आहे. तसेच गुप्त बैठका घेऊन नाराजी दूर करावी, अशी सूचनाही केली. हायकमांड अशा घडामोडी पुन्हा सहन करणार नसल्याचा संदेश सर्वांना द्या, अशीही सूचना राहुल यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news