बंगळूर : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर काँग्रेसने केलेल्या आंदोलनानंतर आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. यामुळे मंत्रिमंडळात समावेश होण्याची खात्री असणाऱ्या इच्छुक आमदारांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री शिवकुमार शनिवारी पुन्हा दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी होणार होता. यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी दिल्लीला धाव घेत राहुल गांधी यांच्याबरोबर चर्चा केली होती. मंत्रिमंडळ यादी एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबरोबर चर्चा करून अंतिम करण्यात येणार होती. परंतु, काँग्रेसने अचानक आंदोलन हाती घेतल्याने मंत्रिमंडळ विस्तार रेंगाळला आहे.
बुधवारी होणारा मंत्र्यांचा शपथविधी सोहळा सध्यासाठी पुढे ढकलण्यात आला आहे तसेच काँग्रेसच्या हायकमांडसोबत होणारी अंतिम चर्चाही पुढे ढकलण्यात आली आहे. या घडामोडीमुळे नवीन मंत्र्यांच्या नियुक्तीला आणखी विलंब होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
काँग्रेस नेत्यांचे आंदोलन आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांच्या अटकेमुळे कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा एकदा पुढे ढकलला जाण्याची शक्यता असल्याचे संकेत मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी मंत्र्यांची यादी अंतिम करण्यात येणार होती.
परंतु, काँग्रेस नेत्यांना अटक करण्यात आल्याने अडचण निर्माण झाली. डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी मंत्रिमंडळ विस्तार आणि नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आयोजित केला होता. यासाठी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची परवानगीही घेण्यात आली होती. त्यादृष्टीने तयारी केली होती.