Karnataka Cabinet Expansion | सवदींना आनंद; अक्कांऐवजी विजयानंद

दोन महिन्यांनी पार पडला मंत्रिमंडळ विस्तार; १९ मंत्री शपथबद्ध, एक जागा रिक्त
बंगळूर : नूतन मंत्र्यांसमवेत मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर, राज्यपाल थावरचंद गेहलोत
बंगळूर : नूतन मंत्र्यांसमवेत मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर, राज्यपाल थावरचंद गेहलोत
Published on
Updated on

बंगळूर : दोन महिन्यांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर सोमवारी ३ ऑगस्ट रोजी १९ मंत्र्यांच्या शपथविधीने पार पडला. ३ जून रोजी डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर बरोबर दोन महिन्यांनी मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला. त्यात अपेक्षेप्रमाणे बेळगाव जिल्ह्यातून ज्येष्ठ नेते आणि भाजपकालीन माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना स्थान मिळाले आहे. मात्र सिद्धरामय्या मंत्रिमंडळात महिला-बालकल्याण मंत्री असलेल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांचे मंत्रिपद हुकले आहे. त्यांच्याऐवजी लिंगायत कोट्यातून बागलकोटचे आमदार विजयानंद काशप्पन्नावर यांना संधी मिळाली आहे. उल्लेखनीय म्हणजे शिवकुमारांच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही. मात्र मंत्रिमंडळात अजून एक स्थान रिक्त असून, ते महिलेला दिले जाण्याची शक्यता आहे.

राजभवनाच्या प्रांगणात सोमवारी सायंकाळी ५ वाजता शपथविधीला सुरुवात झाली. माजी मंत्री चेलुवरयस्वामी व जमीर अहमद खान, संतोष लाड यांच्यासह १९ आमदार मुख्यमंत्री शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले. एका साध्या समारंभात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी नवीन मंत्र्यांना पदाची शपथ दिली. प्रारंभी माजी मुख्यमंत्री दिवगंत धरमसिंग यांचे पुत्र अजय सिंग यांनी देवाच्या नावाने कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर बाळकृष्ण यांनी शपथ घेतली. त्यानंतर एस. बसवंतप्पा, बसवराज रायरेड्डी, एन. चालुवरयस्वामी, लक्ष्मण सवदी, मधु बंगारप्पा, एस. एस. मल्लिकार्जुन, बी. नागेंद्र, नरेंद्र स्वामी, पुट्टरंगशेट्टी, टी. रघुमूर्ती, रिझवान अर्शद, रुद्रप्पा लमाणी, संतोष लाड, के. एम. शिवलिंगगौडा, शिवराज तंगडगी, विजयानंद कशप्पनवर, जमीर अहमद खान यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

हेब्बाळकर, उमाश्री की गायत्री?

३ जून रोजी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासोबत १३ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. आज १९ नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मात्र विशेष म्हणजे या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. आता एकूण मंत्र्यांची संख्या ३३ झाली असून, अजून एक स्थान रिक्त आहे. त्याजागी लक्ष्मी हेब्बाळकर, उमाश्री किंवा गायत्री शांतेगौडा यांची निवड होऊ शकते. दिल्लीहून हायकमांडने पाठवलेल्या यादीत विधान परिषद सदस्या गायत्री शांतेगौडा यांचे नाव होते. मात्र नंतर पडद्यामागील राजकीय घडामोडींमध्ये गायत्री यांचे नाव वगळण्यात आले.

दहा वाजता यस, १२ वाजता गायब

दिल्ली दौरे, चर्चेच्या फेऱ्या व मतभेद झाल्यास राजीनामे असे सगळे अडथळे पार करत मंत्रिमंडळ विस्तार झाला खरा. पण कारवारचे आमदार मंकाळू वैद्य आणि विधान परिषद आमदार गायत्री शांतेगौडा यांची नावे सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंतच्या यादीत असूनही दुपारी १२ च्या दरम्यान ही दोन नावे वगळली गेली. हायकमांडच्या आशीर्वादाने मंत्रिपदासाठी निवड झालेल्या विधान परिषद सदस्या गायत्री यांच्या जागी दावणगिरीचे नेते एस. एस. मल्लिकार्जुन यांची निवड करण्यात आली. हायकमांडची यादी जाहीर होताच मल्लिकार्जुन यांनी आपल्याला मंत्रिपद मिळाले नसल्याने एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी संपर्क साधून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काही मिनिटांतच त्यांच्या नावाचा समावेश केला गेला. मात्र वैद्य यांना वगळून ते पद कुणाला दिले गेले, हे स्पष्ट झाले नाही.

शिवकुमारांचे १६, सिद्धरामय्यांचे ३

मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट झालेल्यांपैकी, माजी मंत्री पुट्टरंगशेट्टी, अरसिकेरे मतदारसंघाचे आमदार शिवलिंगेगौडा व कोप्पळच्या येलबुर्गा मतदारसंघाचे आमदार बसवराज रायरेड्डी यांना वगळता जवळपास सर्वजण मुख्यमंत्री शिवकुमार यांचे समर्थक आहेत. केवळ हे तिघेच माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निकटवर्ती वर्तुळातील मानले जातात. मंत्रिमंडळ विस्तारात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना मंत्रिपदे देण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. मात्र मुख्यमंत्री शिवकुमार यांनी हायकमांडसोबत खेळलेल्या चालींमुळे सिद्धरामय्या यांच्या अनेक समर्थकांना मंत्रिपदे मिळाली नाहीत. हायकमांडने सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात पूर्वी मंत्री असलेल्या एच. सी. महादेवप्पा, के. व्यंकटेश, लक्ष्मी हेब्बाळकर, शिवानंद पाटील, शरणबसप्पा दर्शनपूर, डॉ. सुधाकर व के. एन. राजण्णा यांना या मंत्रिमंडळात संधी दिली नाही.

सिद्धरामय्या नाराज; शपथविधीपासून दूर

नव्या मंत्र्यांची नावे जाहीर होताच इच्छुक काँग्रेस आमदारांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. विशेषतः जवळच्या सहकाऱ्यांना वगळले गेल्याने माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या संतप्त झाले आहेत. त्यामुळे त्यांनी शपथविधी सोहळ्यापासून दूर राहून आपला संताप व्यक्त केला.

नाराज होऊ नका : शिवकुमार

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी इच्छुक आमदारांच्या नाराजीवर प्रतिक्रिया देताना नाराज न होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, काँग्रेसकडे सर्वाधिक आमदार आहेत. त्यापैकी जवळपास सर्वजण मंत्री होण्यासाठी पात्र व अनुभवी आहेत. मात्र मंत्रिपदांची संख्या खूपच कमी (३४) आहे. प्रत्येकाला संधी देणे शक्य नाही, पण एक ना एक दिवस प्रत्येकाला संधी मिळेल. त्यासाठी आपल्याला संयमाने वाट पाहावी लागणार आहे. मला २००४ मध्ये मंत्रिपद मिळाले नव्हते, पण मी धीराने वाट पाहिली. साऱ्या आमदारांनीही तसेच करावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news