Karnataka Politics : मंत्रिमंडळ विस्तार बेळगाव अधिवेशनापूर्वी; हेब्बाळकरांना स्थान?

दुसरी रिक्त जागा नागेंद्र यांना : सिद्धरामय्यांची संमती मिळताच होणार अंतिम निर्णय
Lakshmi Hebbalkar
Lakshmi Hebbalkar
Published on: 
Updated on: 

बंगळूर : जिल्हा पंचायत, तालुका पंचायत तसेच नगर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीचा भाग म्हणून मंत्रिमंडळातील रिक्त जागा भरण्याचा निर्णय मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी घेतला आहे. मंत्र्यांच्या दोन जागा रिक्त असून, राज्यातील प्रभावशाली असलेल्या वाल्मीकी व पंचमसाली समाजांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे. त्यासाठी माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि बी. नागेंद्र यांच्या नावांवर दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे. बेळगावात होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी दोन्ही जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची संमती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सध्या मंत्रिमंडळात महिलांना प्रतिनिधित्व नाही. त्याचप्रमाणे वाल्मीकी समाजालाही योग्य प्रतिनिधित्व नसल्याने नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी महिला तसेच पंचमसाली समाजातील नेत्या लक्ष्मी हेब्बाळकर आणि वाल्मीकी समाजाचे नेते माजी मंत्री बी. नागेंद्र यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची तयारी करण्यात आली आहे.

एआयसीसीचे संघटन सचिव के. सी. वेणूगोपाल व राज्य काँग्रेसचे प्रभारी रणदीपसिंह सूरजेवाला यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी बेळगाव अधिवेशनापूर्वी विस्ताराला परवानगी देण्याची मागणी केली आहे. या दोन्ही नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्र्यांवर सोडला असून, या प्रकरणात हायकमांड हस्तक्षेप करणार नसल्याचे सांगितले आहे.

सिद्धरामय्यांची पसंती वेगळीच

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रिक्त असलेल्या दोन जागांपैकी एक जागा खासदार बी. तुकाराम यांच्या पत्नी व वाल्मीकी समाजातील नेत्या अन्नपूर्णा तुकाराम यांना, तर दुसरी जागा कारवार भागातील धनगर समाजातील माजी मंत्री बी. शिवण्णवर यांना देण्यात यावी, असा आग्रह धरला आहे. मात्र, शिवकुमार यांनी महिला कोट्यातून हेब्बाळकर यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.