

धारवाड : टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटलेली बस रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळून एक महिला ठार झाली तर २५ प्रवासी जखमी झाले. धारवाड तालुक्यातील अमीनभावी गावाजवळ बुधवारी (दि. २२) हा अपघात झाला. त्यातील आठजण गंभीर जखमी आहेत. हुसैनाबी केगनूर (वय ६०, रा. मुनवळ्ळी, ता. सौंदत्ती) असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, धारवाडहून मिरजेकडे निघालेली परिवहन महामंडळाची ही बस अमीनभावी परिसरात पोचताच पुढील टायर फुटला. त्यामुळे, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. चालकाने नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.
परंतु, त्याचा काही उपयोग झाला नाही. अनियंत्रित बस रस्त्याकडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन कोसळली. अपघात इतका भीषण होता की बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनचालकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले.
जखमी प्रवाशांना बाहेर काढून तातडीने धारवाड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच धारवाड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.