

बंगळूर : गुटखा, तंबाखू आणि तंबाखूमिश्रित पान मसाला उत्पादने तसेच विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अन्न सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारने बुधवारी महत्त्वाचा आदेश जारी करत पान मसाला उत्पादनांवर एक वर्षाची बंदी घातली आहे. खुला किंवा पाकिटबंद गुटखा, पान मसाला, तसेच दोन पाकिटांमध्ये दोन वेगळी उत्पादने देऊन ती एकत्र करून मिश्रण स्वरुपात सेवन करण्याची मुभा देणाऱ्या गुटखा पाकिटांवरही बंदी असेल.
गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने मानवी शरीरावर गंभीर परिणाम होत असल्याने आरोग्य खात्याच्या शिफारशींनुसार राज्यभरात तंबाखू किंवा निकोटीन असलेल्या गुटखा आणि पान मसाला उत्पादनांवर एक वर्षाची बंदी असेल. उत्पादन, साठवणूक, वितरण, वाहतूक आणि विक्रीवर ही बंदी लागू असेल. पान मसाल्यात मिसळल्या जाणाऱ्या स्वतंत्रपणे पॅक करून विकल्या जाणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांनाही बंदी लागू असणार आहे. आदेशाचे उल्लंघन करून गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्यास, बीएनएसअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे.
२०१३ मध्ये पहिल्यांदा कर्नाटकात गुटख्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यावेळीही यू. टी. कादर आरोग्यमंत्री होते. मात्र २०१८ नंतर गुटखाबंदीवर शिथीलता आली. अंमलबजावणी ठप्प झाली. शेजारच्या महाराष्ट्र राज्यात गुटख्यावर आधीपासूनच बंदी आहे. त्यामुळे कर्नाटकात गुटखा बनवून तो महाराष्ट्रात काळ्या बाजारात विक्रीला नेला जात असे. यापुढेही त्यालाही आळा बसणार आहे.
दोन पाकिट गुटख्यावरही बंदी
थेट गुटख्यावर २०१३ पासून बंदी आहे. त्यामुळे गुटखा उत्पादकांनी शक्कल लढवत एका पाकिटात सुपारी आणि दुसऱ्या पाकिटात गुटख्याची किक देणारे पदार्थ तसेच तंबाखू अशी दोन पाकिटे बाजारात आणली. या दोन्ही पाकिटांतील पदार्थ एकमेकांत मिसळल्यानंतर गुटखा बनतो. अशा दोन पाकिटांवरही आता बंदी असेल. नव्या आदेशात तसे नमूद करण्यात आले आहे.
अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार एक वर्षाची बंदी घातली जाऊ शकते. आधी ही बंदी कायमस्वरूपी होती. मात्र ती कायद्यातील तरतुदींना धरून नव्हती. म्हणून नव्याने आदेश काढण्यात आला आहे, अशी माहिती अन्न सुरक्षा आयुक्त के. श्रीनिवासन यांनी दिली.