Karnataka ATM Theft: गॅस कटरने एटीएम फोडून १९ लाख लंपास

विजापूर जिल्‍ह्यातील गोलसंगीत धाडसी चोरी
Karnataka ATM Theft: गॅस कटरने एटीएम फोडून १९ लाख लंपास
Published on
Updated on

अंकली : विजापूर जिल्ह्यातील निडगुंदी तालुक्यातील गोलसंगी गावात कॅनरा बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून चोरट्यांनी तब्बल १९ लाख २९ हजार रुपये लंपास केले. सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री सुमारे २.२० च्या सुमारास ही घटना घडली आहे.

चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम कापून त्यातील रोकड काढून घेत पसार झाले. घटनेची माहिती मिळताच विजापूरचे जिल्‍हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, बसवण बागेवाडीचे डीवायएसपी चंद्रकांत नंदरेड्डी, निडगुंदीचे सीपीआय शरणगौडा गौडर, उपनिरीक्षक यतीश के. एन., कुडगीचे उपनिरीक्षक मल्लिकार्जुन तळवार, क्राईम विभागाचे उपनिरीक्षक व्ही. एच. हत्तळी, कोल्लारचे उपनिरीक्षक अशोक नायक, कॅनरा बँकेचे प्रादेशिक अधिकारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून बँक व्यवस्थापक शरणप्पा एस. होनवाड व कर्मचाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. एटीएम परिसर, आजूबाजूच्या भागातील हालचालींचीही पाहणी करण्यात आली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून बँकेसमोरील रस्त्यावर क्रमांक नसलेली एक संशयित कार वारंवार फिरत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या कारमधून आलेल्या व्यक्तींचा चोरीशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतरच सत्यता समोर येणार आहे.

या घटनेची नोंद कुडगी पोलिस ठाण्यात झाली आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास गतिमान केला आहे. गतावर्षी मनगुळी येथील कॅनरा बँक, चडचण येथील एसबीआय बँकेतही मोठ्या चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news