

बंगळूर : अलमट्टी, केआरएस आणि तुंगभद्रा यासारख्या राज्यातील अनेक जलाशयांच्या सुरक्षेबाबत आता चिंता व्यक्त केली जात आहे. जलाशयांवर सायबर हल्ला झाला असल्याचे उघडकीस आले आहे. राज्याच्या जलाशय सुरक्षा आणि धरण सुरक्षा संघटनेच्या आणि संबंधित विभागांच्या संकेतस्थळांवर सायबर गुन्हेगारांनी सायबर हल्ला करून त्यातील माहिती चोरल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.
जलाशय सुरक्षा संघटना आणि जलाशय पुनर्वसन व सुधारणा प्रकल्पाच्या राज्य प्रकल्प व्यवस्थापन युनिट यांच्याशी संबंधित संकेतस्थळे हॅक झाल्याची तक्रार जलाशय सुरक्षा संघटनेच्या मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सायबर कमांड सेंटरकडे केली आहे. प्राथमिक तपासात सायबर गुन्हेगारांनी ब्रिटन किंवा अमेरिकेमधून हे हॅकिंग करून माहिती चोरली असण्याची शक्यता असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. अज्ञात आयपी ॲड्रेसवरून एसपीयूएम, डीआरआयपी आणि जलसंपदा विकास प्राधिकरण यांच्याशी संबंधित काही आयपी ॲड्रेसवर प्रवेश मिळवून गोपनीय माहिती चोरण्यात आली आहे.
राज्यातील मोठ्या जलाशयांच्या सुरक्षेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी डीआरआयपीकडे आहे. ही संकेतस्थळे हॅक झाल्यामुळे जलाशयांशी संबंधित माहिती उघड होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या कृत्यामागील अज्ञात व्यक्ती किंवा गटाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच, अज्ञात आयपी ॲड्रेस, संबंधित नेटवर्क आणि इतर डिजिटल माहितीबाबत तपशील गोळा केला जात आहे. ही संकेतस्थळे प्रामुख्याने अमेरिकेतून हॅक झाल्याचे काही पुरावे सापडल्याचे सूत्रांनी सांगितले.
माहिती विकली जाण्याची शक्यता
जलाशय सुरक्षा संघटनेने राज्यातील केआरएस, भद्रा, वराही, लिंगनमक्की, हारंगी, हेमावती आणि तुंगभद्रा यासारख्या सर्व धरणांची संपूर्ण माहिती गोळा केली आहे. यामध्ये पाण्याची आवक, विसर्ग, पाणी साठवण क्षमता, प्रवाहाचा मार्ग, क्रेस्ट गेटस्चा तपशील, संबंधित धरणांची पाणलोट क्षेत्रे आणि सुरक्षा व्यवस्था यांसारख्या बाबींचा समावेश आहे. यातील केवळ काही माहितीच सार्वजनिक केली जाते. मात्र, इतर महत्त्वाची माहिती गोपनीय ठेवली जाते. आता, हॅक करणाऱ्या व्यक्तीने किंवा गटाने धरणांची संपूर्ण माहिती चोरली असून, पैशांसाठी ती देशद्रोही किंवा समाजकंटकांना विकली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.