

विजापूर : अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यानंतर बबलेश्वर विधानसभा मतदारसंघातील १५ गावांमधील सुमारे ५६०० एकर जमीन बाधित होणार आहे. या जमिनीच्या संपादनासाठी प्रस्तावित भरपाईपैकी बबलेश्वर मतदारसंघासाठी किमान ५०० कोटी रुपये राखीव ठेवावेत, अशी मागणी मंत्री एम. बी. पाटील यांनी जलसंपदा मंत्री एन. चेलुवरायस्वामी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पहिल्या टप्प्यात १००० एकर जमिनीची भरपाई देण्यात यावी. अलमट्टी धरणाची उंची सध्याच्या ५१९.६० मीटरवरून ५२४.२५६ मीटरपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे कृष्णा खोऱ्यातील १८४ गावांमधील ७५ हजार ५६३ एकर जमीन बाधित होणार आहे. त्यात विजापूर जिल्ह्यातील ३१ गावांचा समावेश आहे. बबलेश्वर विधानसभा मतदारसंघातील १५ गावांमधील सुमारे ५६०० एकर जमीन संपादित केली जाणार आहे.
सध्या प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या चिक्कलगळी, शिरबूर, होसूर आणि कणबूर या ४ गावांना प्राधान्य देऊन पहिल्या टप्प्यात ५०० कोटी रुपयांची भरपाई देण्यात यावी. उर्वरित १० गावांसाठीही अधिसूचना काढून भरपाई वितरणाची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, असे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.