

बेळगाव, चिकोडी : लोकशाहीचे गोडवे गाणाऱ्या देशात आंदोलनाचा अधिकार संविधानानेच दिलेला असताना, आंदोलन दूरच; देशाच्या गृहमंत्र्यांच्या सभेलाही उपस्थित राहू न देण्याचा ठोकशाही कर्नाटकी कारभार शनिवारी मराठी भाषिकांना अनुभवास आला. गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापुरातील सभेसाठी निघालेल्या मराठी नेत्यांची कर्नाटकी पोलिसांनी हत्तरगी टोल नाक्यावर अ़डवणूक करून त्यांना दिवसभर बंदी बनवले. मात्र नेत्यांनीही महामार्गावरच ठिय्या आंदोलन करून प्रशासनाला प्रत्युत्तर दिले. अखेर महामार्गावर वाहनांची कोंडी वाढताच पोलिसांनी मराठी नेत्यांना अटक करून बेळगाव एपीएमसी पोलिस स्थानकात आणले.
शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते आणि कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ विविध वाहनांमधून कोल्हापूरकडे जात होते. मात्र कर्नाटक पोलिसांनी हत्तरगी टोल नाक्यावर कार्यकर्त्यांची वाहने अडवली. सुरक्षेच्या कारणास्तव कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगाव जिल्हा प्रशासनाला दिलेल्या सूचनेनंतर समितीच्या नेत्यांना रोखण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, समितीच्या नेत्यांनी याबाबतचा लेखी आदेश दाखवण्याची मागणी केली. पोलिसांकडे तो आदेश नव्हता. तरीही समिती नेत्यांना पुढे कोल्हापूरकडे जाऊ दिले गेले नाही.
त्यामुळे मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्यासह नेते आणि कार्यकर्त्यांनी महामार्गावर आपली वाहने आडवी लावली आणि ठिय्या मारूऩ आंदोलन सुरू केले. परिणामी हत्तरगी टोल नाका परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला, रहदारीची कोंडीही झाली. शेवटी पोलिसांनी सर्व नेत्यांना व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिसी वाहनातून बेळगाव एपीएमसी पोलीस स्थानकात नेले. पोलिसांच्या या कृत्यामुळे समितीच्या नेत्यांसह मराठी भाषिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बारा जणांना हत्तरगी टोल नाक्यावरून एपीएमसी पोलीस ठाण्यात दुपारी आणले. प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत त्यांना ताब्यात घेऊन सायंकाळी सोडून देण्यात आले, अशी माहिती एपीएमसीचे पोलीस निरीक्षक उस्मान आवटी यांनी दिली महामार्गावर ठिय्या आंदोलनात मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे,कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, रमाकांत कोंडुस्कर, अमर येळ्ळूकर, अंकुश केसरकर, सुनील बाळेकुंद्री, नेताजी जाधव, आनंद आपटेकर, निंगाप्पा मोरे, विकास कलघटगी, सुहास किल्लेकर, किरण मोटणकर यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला.