

धारवाड : चालकाचे नियंत्रण सुटून कार दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची हृयद्रावक घटना मंगळवारी पहाटेच्या सकाळच्या सुमारास धारवाड तालुक्यातील वेंकटपूर गावाजवळीळ राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले आहेत. महामार्गावर बेळगावनजीकच्या धाब्यावर जेवण करून धारवाडकडे परतत असताना हा अपघात झाला.
विनायक (वय २५), मंजुनाथ (वय २९) व बसवराज (वय ३४) अशी मृतांची नावे आहेत. अभिषेक, अजय व बसनगौडा हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी धारवाड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हे सर्व जण दावणगिरी जिल्ह्यातील केरेयागळ गावचे रहिवासी आहेत.
सहाही जण बेळगाव-धारवाड रोडवरील एका धाब्यात जेवण करून धारवाडच्या दिशेने कारमधून प्रवास करत होते. वेंकटपूरजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट दुभाजकाला धडकली. त्यात तिघांचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले.