

बेळगाव : रहदारी नियमांचे उल्लंघन करुन दंड न भरलेल्या वाहनधारकांना एक राज्य सरकारने आणखी एकदा दिलासा दिला आहे. रहदारी दंड (ई-चलन) भरण्यासाठी पुन्हा एकदा ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. नवीन आदेशानुसार २१ जून ते १० जुलै या कालावधीत प्रलंबित रहदारी दंड भरणाऱ्यांना ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. वाहनधारकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य सरकारने ४ जून रोजी जारी केलेल्या आदेशानुसार कर्नाटक राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या माहितीनुसार २०२५ मध्ये अनेक दंडवसुली मोहिमा राबवूनही राज्यात सुमारे २,८२७ कोटी रुपये थकबाकी आहे. त्यामुळे, हा रहदारी दंड भरण्यासाठी आता पुन्हा ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. या मोहीमेंतर्गत मे २०२६ पूर्वी पोलिस खात्याच्या रहदारी ई-चलनांमध्ये नोंदवलेल्या प्रलंबित प्रकरणांचा दंड व १९९१ ते २०२२ दरम्यान परिवहन विभागात नोंदवलेला दंड वाहनधारकांना भरता येणार आहे.
बंगळूर रहदारी पोलिसांनी दंड वसुली मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वप्रथम ही विशेष मोहीम सुरु केली आहे. त्यासाठी जास्त रहदारी असलेल्या प्रमुख भागांमध्ये विशेष काउंटर उघडण्याची योजना आखली आहे. बेळगावातही हजारो वाहनधारकांकडे दंड प्रलंबित आहे. अनेकवेळा सवलती देऊनही वाहनधारक दंड भरण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे, सध्या रहदारी पोलिस वाहनधारक रहदारी नियमांचे उल्लंघन करताना आढळला तरी त्याच्याकडून प्रलंबित दंड वसूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.