Karnataka Bribery Case : ५० लाखांची लाच; तहसीलदार जाळ्यात

भूनोंदी दुरुस्तीसाठी एक कोटीसह एक एकर जमिनीची मागणी
Karnataka Bribery Case
Karnataka Bribery Case
Published on
Updated on

धारवाड : जमिनीच्या नोंदी दुरुस्त करून देण्यासाठी तब्बल एक कोटी रुपये आणि एक एकर जमीन देण्याची मागणी करून त्यापैकी ५० लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना धारवाडचे तहसीलदार सच्चिदानंद कुचनूर यांना लोकायुक्तांच्या पथकाने गुरुवारी रात्री रंगेहाथ पकडले. धारवाड येथील केसीडी मैदानाजवळ ही कारवाई करण्यात आली.

धारवाड तालुक्यातील यरिकोप्प गावाजवळ ३३ एकर जमीन असलेल्या एका रिअल इस्टेट डेव्हलपरने जमिनीवरील ‘अ’ दर्जाचा पडीक भाग अधिकृतरीत्या कमी करून जमीन वापरासाठी योग्य करण्यासाठी तालुका कार्यालयात अर्ज केला होता. संबंधित काम करून देण्यासाठी तहसीलदार कुचनूर यांनी एक कोटी रुपये तसेच एक एकर जमीन देण्याची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

लाचेच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या डेव्हलपरने लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लोकायुक्त एसपी सिद्धलिंगप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ५० लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्यासाठी तहसीलदार केसीडी मैदानाजवळ आले.

यावेळी दबा धरून बसलेल्या लोकायुक्तांच्या पथकाने कारवाई करत त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. लोकायुक्त पथकाने तहसीलदारांकडून ५० लाख रुपयांची लाचेची रक्कम जप्त केली आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, तहसीलदारांच्या कार्यालयासह निवासस्थानीही लोकायुक्त पथकाने झडती घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news