Karle Subhedar accident: कर्लेचे सुभेदार अपघातात मृत्युमुखी

मेहुणीच्‍या लग्नासाठी सुट्टीवर येताना कंटेनरखाली घुसली कार; मध्य प्रदेशात अपघात
Karle Subhedar accident: कर्लेचे सुभेदार अपघातात मृत्युमुखी
Published on
Updated on

बेळगाव : समोरून निघालेल्या भरधाव कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या कार चालकाने कंटेनरला धडक दिली. या अपघातात कर्ले गावचे नायब सुभेदार मृत्युमुखी पडले, तर त्यांचे सासरे जखमी आहेत. शुक्रवारी मध्य प्रदेशात हा अपघात घडला.

रामचंद्र मोहन पाटील (वय ३२, रा. ब्रह्मलिंग गल्ली, कर्ले, ता. बेळगाव) असे मृत नायब सुभेदाराचे नाव आहे. त्यांचे मावस सासरे गोविंद पाटील (वय ४९) हे किरकोळ जखमी झाले. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास मध्य प्रदेशातील उज्जैन येथील गोरठ महामार्गावरील पदमाखोरिया गावाजवळ हा अपघात घडला.

अधिक माहिती अशी : डिसेंबरमध्ये सुट्टीवर येऊन पुन्हा सेवेत रुजू झालेले रामचंद्र हे मेहुणीचे लग्न असल्याने पुन्हा सुटी घेऊन येत होते. सध्या ते अंबाला येथे कार्यरत होते. सहा महिन्यांपूर्वी दिवाळी त्यांनी कार घेतली होती. पत्नीला विमानाने पाठवून ते व त्यांचे मावस सासरे गोविंद पाटील हे कारने बेळगावला येत होते.

महामार्गावरून कारने येत असताना समोरून जाणाऱ्या कंटेनरचालकाने अचानक करकचून ब्रेक मारला; मात्र कार चालवत असलेल्या रामचंद्र पाटील यांना याचा अंदाज आला नाही. त्यामुळे पाठीमागून भरधाव कार कंटेनरखाली जाऊन घुसली. ड्रायव्हिंगच्या बाजूचा बोनेट बराच आतपर्यंत घुसल्याने रामचंद्र यांचा जागीच मृत्यू झाला. बाजूला बसलेले मावस सासरे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करून रूग्णवाहिकेद्वारे त्यांना गावी आणण्यात येत आहे.

तेरा वर्षांपूर्वी भरती

रामचंद्र पाटील हे तेरा वर्षांपूर्वी भोपाळ येथे भरती झाले होते. विविध पदांवर काम करताना सध्या ते नायब सुभेदार म्हणून कार्यरत होते. त्यांचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, भाऊ, दोन विवाहित बहिणी, चुलते, चुलती असा मोठा परिवार आहे. त्यांचे पार्थिव शनिवारी रात्री उशिरा बेळगावला पोहोचले. ते लष्कराच्या ताब्यात असून, रविवारी सकाळी ते कुटुंबीयांकडे सुपूर्द केले जाणार आहे. रविवारी कर्ले येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news