

बेळगाव : बाल विवाह करणे हा कायद्याने गुन्हा असला तरी चक्क एका आयपीएस अधिकार्याच्या नातेवाईकांनीच बालविवाह केला. विशेष म्हणजे या विवाहाला आयपीएस अधिकारीही उपस्थित होते. त्यामुळे ते सुद्धा अडचणीत आले आहेत.
अथणी तालुक्यातील ऐगळीत हा प्रकार घडला आहे. याविरोधात अथणी बाल विकास अधिकार्यांनी ऐगळी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेंद्र सैदप्पा गडादी याच्यावर पोक्सो व बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या विवाहासाठी मुलीच्या आधार कार्डातही फेरफार केल्याचे उघडकीस आले आहे. 1 जून 2008 रोजी त्या मुलीचा जन्म झाला होता. मात्र, त्या मुलीचा विवाह लवकर करण्यासाठी आधार कार्डमध्ये फेरफार करुन जन्मतारीख 1 जून 2002 अशी नोंदविल्याचा आरोप होत आहे. या विवाहासाठी आयपीएस अधिकारी रवींद्र गडादी व त्याचे कुटुंबीय हजर होते. अल्पवयीन मुलीच्या आईने आयपीएस अधिकारी गडादी यांनी आम्हाला नात्यातील मुलाबरोबर विवाह करण्याचा आग्रह धरला असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. तीन महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीने मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे, या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. आता वरिष्ठ अधिकारी हे प्रकरण कसे हाताळणार, याचीच उत्सुकता आहे.