

निपाणी : पुढारी वृत्तसेवा विविध चोरीच्या गुन्ह्यात कर्नाटक, महाराष्ट्र या दोन राज्यासह चार जिल्ह्यातील पोलिसांसाठी वाॅण्टेड असलेल्या आंतरराज्य फासेपारधी दरोडेखोर टोळीतील तिघांना निपाणी ग्रामीण पोलिसांनी बुधवारी अटक केली. दरम्यान या टोळीकडून ८ जानेवारी २०२३ रोजी कोगनोळी येथे झालेल्या माजी शिक्षणाधिकाऱ्यांच्या घरातील दरोडा प्रकरणाचा उलगडा या टोळीकडून झाला असून अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये दोघा सख्ख्या भावांचा समावेश आहे. या तिघांकडून ८ तोळे सोन्याचे, १४ किलो चांदीचे दागिने, १ दुचाकी असा १० लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून टोळीचा म्होरक्या सोन्याच्या दागिन्याची बॅग घेऊन पसार झाला आहे. या आंतरराज्य टोळीला अटक करण्यात आल्याने जिल्हा पो.प्रमुख डॉ.भीमाशंकर गुळेद यांनी निपाणी ग्रामीण पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
अर्जुन उर्फ अर्जंट नबीब भोसले (वय ४५ ) रा.चाबूसरवाडी ता.मिरज जि. सांगली, याराना दिलीप काळे (वय ३०) व त्याचा भाऊ नमन उर्फ जयवंत दिलीप काळे (वय २४) रा.धुळगाव ता.तासगाव जि.सांगली अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. यात टोळीचा म्होरक्या गोदरेज लख्खाप्पा पोवार (रा.आरग) ता.मिरज जि.सांगली हा चोरीतील लुटलेल्या सुमारे १० किलो सोन्याच्या दागिन्याची बॅग घेऊन पसार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध जारी ठेवला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, निपाणी ग्रामीण पोलीसांची महामार्गावर गस्त सुरू असताना जिल्हा पोलिस मुख्यालयातून आलेल्या संदेशाच्या आधारे चिकोडीचे डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी.एस.तळवार, उपनिरीक्षक शिवराज नाईकवडी यांनी एलसीबी पथकाचे हावलदार एम.एफ.नदाफ, संजय काडगौडर, रघु मेलगडे, अमर चंदनशिवे, यासिन कलावंत, राजू दिवटे, के.डी.हिरेमठ, शेखर असोदे, गोपाळ बडीगेर, तोफिक मुजावर, प्रभू सिद्धाठगीमठ आदींनी महामार्गावर तवंदी घाट ते कोगनोळी टोलनाका या टापूत महामार्गावर सापळा रचला.
दरम्यान या टोळीने गुंगारा देत कर्नाटक सीमा करून महाराष्ट्रात प्रवेश केला. यावेळी पोलीस पथकाने या टोळीचा पाठलाग करून कागल हद्दीतील लक्ष्मी टेकडीजवळ महामार्गावर या टोळीतील तिघांना ताब्यात घेतले. यावेळी काही अंतर पुढे असलेल्या या टोळीचा दुचाकीवरील म्होरक्या गोदरेज पोवार हा सोन्याने भरलेली बॅग घेऊन पसार झाला.
दरम्यान ताब्यातील तिघांची कसून चौकशी केली असता तिघांनीही आपण बेळगाव जिल्ह्यातील मुरगूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेनापुर, संकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील हेब्बाळ व हंचिनाळ येथील घरफोडीसह ८ जानेवारी २०२३ रोजी आपण कोगनोळी येथील निवृत्त शिक्षणाधिकारी सी.वाय.पाटील यांच्या घरावर दरोडा टाकून ३० तोळे सोने व रोख रक्कम लुटल्याची कबुली दिली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून निपाणी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांची हिंडलगा जेलमध्ये रवानगी केल्याची माहिती सीपीआय बी.एस.तळवार यांनी दिली.
विशेष म्हणजे कर्नाटक-महाराष्ट्र या दोन राज्यासह बेळगाव,बागलकोट, विजापूर,धारवाड या चार जिल्ह्यात विविध ठिकाणी आपण घरफोडी केल्याची कबुली या टोळीने दिली आहे. दरम्यान आंतरराज्य वॉंटेड असलेल्या फासेपारधी टोळीतील तिघांना अटक करण्यात आल्याने अटकेतील तिघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखीन काही घरफोडीसारखे गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.त्या दृष्टीने तपास चालवला असल्याची माहिती अशी सीपीआय बी. एस.तळवार यांनी दिली.
निपाणी पोलिसांनी पकडलेल्या या फासेपारधी टोळीची सांगली जिल्ह्यातील त्यांच्या मूळगावी मोठी दहशत आहे. त्यामुळे या टोळीला सहजासहजी कोणतीही यंत्रणा पकडू शकत नाही. दरम्यान या टोळीच्या म्होरक्या फरार झाल्यानंतर निपाणी पोलिसांचे पथक शोधासाठी त्यांच्या मूळगावी गेले होते. पण काही अंतरावर त्याचे गाव असताना तेथील स्थानिक नागरिकांनी निपाणी पोलिसांना या टोळीची दहशत मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या परिसरात केलेला एकही माणूस सहसा परत येत नाही,अशा सूचना केल्याने तपासासाठी गेलेले पोलीस पथकही काही काळ थांबून म्होरक्याचा शोध न घेताच रिकाम्या हाताने परतले आहे.