

बेळगाव : आजची जेन झी पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या सामाजिक, आर्थिक आणि डिजिटल वातावरणात घडत आहे. डिजिटल क्रांतीमुळे यांच्या आवडीनिवडी, विचारसरणी आणि जीवनशैलीत कमालीचा बदल झाला आहे. वरवर उथळ वाटणारी ही पिढी अजिबात उदासीन नसून कमालीची वास्तववादी आहे. जुन्या साच्यात अडकण्यापेक्षा स्वतःचे अस्तित्व, मानसिक शांतता आणि स्वातंत्र्याला प्राधान्य देत ही तरुण पिढी नव्या वाटा शोधत क्रांती घडवण्यास सज्ज आहे.
नव्या तरुण पिढीला नात्यात बंधनांपेक्षा पर्सनल स्पेस आणि आदर हवा असतो. करिअरची अनिश्चितता सांभाळताना भावना दुखावण्यापेक्षा नाती हळुवार ठेवणे त्यांना सोयीचे वाटते. कौटुंबिक दबावातून केलेले लग्न किंवा नात्यातील ‘अधिकार गाजवणे’ या पिढीला अजिबात मान्य नाही. लांबलचक रडक्या टीव्ही मालिका आणि जाहिरातींचा अडथळा यांना नकोसा वाटतो. त्याऐवजी ३० सेकंदांचे रील्स, यूट्यूब शॉट्स आणि ओटीटीवर स्वतःच्या वेळेनुसार बिंज-वॉचिंग करणे यांना आवडते.
खाद्यसंस्कृतीत रोजचा पारंपरिक स्वयंपाक टाळून नवीन कॅफे, वेगवेगळ्या प्रदेशातील खाद्यसंस्कृतीचा मिलाफ असलेला फ्युजन फूड आणि झोमॅटो-स्विगीवरून ऑन-डिमांड जेवण मागवण्याला यांची पसंती आहे.